पाचल (राजापूर): राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात घरगुती गॅस सिलिंडरची अनधिकृत विक्री आणि काळाबाजार होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. राजापूर पुरवठा विभागाने बुधवारी ‘सद्गुरु गॅस सेवा’ या सर्व्हिस सेंटरवर धाड टाकून तब्बल १०९४ ग्राहक कार्ड्स आणि सिलिंडर जप्त केले आहेत. या धडक कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात गॅस एजन्सी चालकांचे धाबे दणाणले आहेत.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सर्व्हिस सेंटरमध्ये ग्राहकांची गॅस कार्ड्स (पुस्तिका) बेकायदेशीरपणे जमा करून ठेवली जात होती. या कार्ड्सचा वापर करून परस्पर सिलिंडर बुक केले जायचे आणि नंतर ते गरजू ग्राहकांना किंवा हॉटेल व्यवसायासाठी चढ्या दराने विकले जात होते. अनेक ग्राहकांच्या नावावर सिलिंडरची उचल होत असतानाही प्रत्यक्षात त्यांना गॅस मिळत नव्हता. गॅस टंचाईचा गैरफायदा घेत हा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.
पुरवठा विभागाची ‘सर्जिलक स्ट्राईक’
१ एप्रिल रोजी दुपारी १:३० च्या सुमारास पुरवठा विभागाने अचानक छापा टाकला. या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
- १०९४ अनधिकृतपणे साठवलेली गॅस कार्ड्स.
- १ व्यावसायिक (Commercial) सिलिंडर.
जप्त केलेला सर्व मुद्देमाल सध्या राजापूर पुरवठा विभागाच्या ताब्यात असून पुढील चौकशी सुरू आहे.
संचालकांचे म्हणणे: या प्रकरणाबाबत सर्व्हिस सेंटरचे संचालक विलास भिकू कोलते (रा. रायपाटण) यांना विचारले असता त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. “आम्ही गेली ४० वर्षे सेवा देत आहोत. ग्राहक स्वतःहून आपली गॅस पुस्तिका आमच्याकडे विश्वासाने ठेवून जातात,” असा दावा त्यांनी केला आहे.
कारवाई करणारे पथक
ही यशस्वी कारवाई राजापूर पुरवठा निरीक्षक निलेश लाड, पाचल मंडळ अधिकारी सौ. पूनम गावित, तलाठी नरके, शशिकांत कांबळे, विक्रम पाटील, कृष्णा गोरड, अमित चिले आणि पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे यांच्या पथकाने केली.
रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ
रत्नागिरी जिल्ह्यातील इतर गॅस एजन्सींशी संबंधित कनेक्शनचे ट्रान्सफर आणि बुकिंग प्रक्रियेतही काही गैरप्रकार सुरू आहेत का, याचा तपास आता पुरवठा विभाग करत आहे. “सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी पाचलमधील स्थानिक नागरिकांमधून जोर धरत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 02-04-2026














