रत्नागिरी: शहरामध्ये भाजी, मटण आणि मच्छी मार्केटसह सर्वच ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर धोकादायक पद्धतीने वाढल्याने रत्नागिरी नगर पालिकेने आता कठोर पावले उचलली आहेत. शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून, पहिल्याच दिवशी २६ किलो ५०० ग्रॅम प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी या कारवाईची माहिती देताना व्यावसायिकांना कडक इशारा दिला आहे.
प्लास्टिकमुळे गटारे तुंबली; कचऱ्याचे प्रमाण वाढले
रत्नागिरी शहरात किरकोळ विक्रेत्यांपासून मोठ्या दुकानदारांपर्यंत प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकही प्लास्टिक पिशव्यांमध्ये कचरा भरून तो रस्त्यावर किंवा गटारात फेकत आहेत. यामुळे पावसाळ्यात गटारे ‘चोकअप’ होण्याचे प्रमाण वाढले असून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. या पार्श्वभूमीवर, नगर पालिकेच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.
अशी होणार दंडात्मक कारवाई:
नगर पालिकेने स्पष्ट केले आहे की, सुरुवातीचे आठ दिवस जनजागृती केली जाईल, मात्र त्यानंतर खालीलप्रमाणे दंड आकारला जाणार आहे:
- पहिल्यांदा आढळल्यास: ५,००० रुपये दंड.
- दुसऱ्यांदा आढळल्यास: १०,००० रुपये दंड.
- तिसऱ्यांदा आढळल्यास: १५,००० रुपये दंड.
- चौथ्यांदा आढळल्यास: संबंधित व्यावसायिकावर थेट कायदेशीर फौजदारी कारवाई केली जाईल.
पहिल्याच दिवशी ४८ दुकानांची झाडाझडती
बुधवारी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नगर पालिकेच्या पथकाने शहरातील ४८ विविध दुकानांची अचानक तपासणी केली. या कारवाईत तब्बल २६ किलो ५०० ग्रॅम वजनाच्या प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. सध्या कचरा गाडीवरून ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना प्लास्टिक न वापरण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत.
नगराध्यक्षांचे आवाहन: “रत्नागिरी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची किंवा नगरसेवकांची नाही, तर ती प्रत्येक नागरिकाची आहे. शहर सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी जनतेने स्वतःहून या मोहिमेत सहभागी व्हावे आणि कापडी पिशव्यांचा वापर करावा,” असे आवाहन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी केले आहे.
नागरिकांनो, हे लक्षात ठेवा:
- घरचा कचरा प्लास्टिक पिशवीत भरून फेकू नका.
- बाजारात जाताना सोबत घरची कापडी किंवा तागाची पिशवी ठेवा.
- दुकानदार प्लास्टिक पिशवी देत असल्यास ती नाकारा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 02-04-2026














