माखजन (प्रतिनिधी): कोकणवासियांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची (NH 66) दुरवस्था आता लोकार्पण होण्यापूर्वीच चव्हाट्यावर आली आहे. ‘गतिमान विकास’ आणि ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवणाऱ्या केंद्र सरकारचे या महामार्गाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून, निकृष्ट कामामुळे महामार्गावर ठिकठिकाणी भेगा पडल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
लोकार्पणाच्या प्रतीक्षेतच रस्ता उखडला
गेली अनेक वर्षे रखडलेल्या या महामार्गाच्या कामामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत, तर काही ठिकाणी चक्क काँक्रीटमधील लोखंडी शिगा बाहेर आल्या आहेत. संगमेश्वर तालुक्यातील आरवलीपासून चिपळूणपर्यंत ही भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. आरवली, खेडशेत, कामथे घाट आणि असुरडे परिसरात रस्त्याचा पृष्ठभाग खाली-वर झाल्याने वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे.
कोकण रेल्वेचा आदर्श विसरलात का?
स्वातंत्र्यानंतर कोकण रेल्वेचा प्रकल्प कमी वेळेत आणि अनेक आव्हाने असतानाही पूर्ण झाला होता. मात्र, कोकणातून दक्षिण भारताला जोडणाऱ्या या महामार्गाला नेमके कशाचे ग्रहण लागले आहे, असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे. डोंगर आणि वळणांचे कारण पुढे करून कामाला विलंब लावला जात असल्याची टीका होत आहे.
अपघातांचे सत्र आणि धुळीचे साम्राज्य
रस्त्याच्या कामाच्या संथ गतीमुळे आणि चुकीच्या पद्धतीने लावलेल्या डायव्हर्जनमुळे रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच, रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे महामार्गालगत राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
प्रमुख समस्या:
- निकृष्ट दर्जा: चिपळूणकडे जाताना असुरडे खिंडीत रस्त्यावर शिगा बाहेर आल्या आहेत.
- कामाचा संथ वेग: अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामे वर्षानुवर्षे रखडली आहेत.
- खड्डे आणि भेगा: नवीन झालेल्या काँक्रीटच्या रस्त्यालाही तडे गेले आहेत.
नेत्यांच्या श्रेयावर सवाल
“जेव्हा या महामार्गाचे लोकार्पण होईल, तेव्हा श्रेय लाटण्यासाठी मंत्री, खासदार आणि आमदार उर भरून येतील. पण सध्या सुरू असलेल्या या हालअपेष्टांना जबाबदार कोण?” असा खोचक सवाल कोकणातील नागरिक विचारत आहेत. या एकूणच भीषण परिस्थितीकडे केंद्र आणि राज्य शासन गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:44 02-04-2026














