रत्नागिरी : पावस येथे राष्ट्रीय परिसंवादात ३२ शोधनिबंध सादर

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील पावस येथे स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाकडून श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज प्रबोधिनी आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही सत्रे मिळून ३२ शोधनिबंध सादर केले गेले.

द्वि-दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोप प्रसंगी प्रबोधिनीचे मार्गदर्शक डॉ. प्रदीप ऊर्फ बाबासाहेब तराणेकर, प्रबोधिनीचे विश्वस्त नितीन देशपांडे आणि डॉ. श्वेता जेजुरकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे प्रतिनिधी हेमंत गोडबोले आणि या परिसंवादासाठी समन्वय साधणारे दिगंबर जोशी उपस्थित होते. परिसंवादाचे आयोजन श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या साहित्याचा आणि कार्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी करण्यात आले होते. या उपक्रमात डॉ. प्रदीप ऊर्फ बाबासाहेब तराणेकर, डॉ. श्वेता जेजुरकर, डॉ. पंकज जाजे, शरद महाराज जोशी आणि डॉ. कल्पना आठल्ये यांनी सत्राध्यक्ष पद भूषविले.

दोन्ही सत्रे मिळून ३२ शोधनिबंध सादर केले गेले. या सत्रांमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी आणि तीन प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर केले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच प्रबोधिनीच्या पुढील कार्यक्रमांना सहाय्याचे आश्वासन दिले. प्रबोधिनीचे विश्वस्त डॉ. प्रदीप ऊर्फ बाबासाहेब तराणेकर यांनी उपस्थित सर्व अभ्यासक व भक्तांचे कौतुक केले व पुढील वर्षी होणाऱ्या परिसंवादाचे सुतोवाच केले. दिगंबर जोशी यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:55 PM 31/Oct/2024