नवी दिल्ली: आम आदमी पार्टीचे (AAP) तरुण आणि आक्रमक नेते, राज्यसभा खासदार राघव चड्डा यांना पक्षाने राज्यसभेतील उपनेते (Deputy Leader) पदावरून हटवल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या फेरबदलानंतर राघव चड्डा यांनी पहिल्यांदाच आपली उघड प्रतिक्रिया दिली असून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक अत्यंत भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे.
“मी गप्प आहे, पण हरलेलो नाही”
राघव चड्डा यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत सूचक विधान केले आहे. ते म्हणतात, “माझ्या शांततेचा अर्थ माझा पराभव समजू नका. मला गप्प करण्यात आले आहे, पण मी हरलेलो नाही.” गेल्या काही काळापासून राघव चड्डा यांची पक्षातील मोठ्या निर्णयांपासून असलेली दुरी चर्चेचा विषय ठरली होती, अशातच त्यांनी थेट पक्षाच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जनतेचे मुद्दे मांडणे हा गुन्हा आहे का? – चड्डांचा सवाल
व्हिडिओमध्ये राघव चड्डा यांनी जनतेला उद्देशून काही खळबळजनक प्रश्न विचारले आहेत:
- “मी संसदेत जनतेचे मुद्दे मांडतो, हा काय गुन्हा आहे का? मी काही पाप केले आहे का?”
- “आम आदमी पार्टीने संसदेला सांगितले आहे की, मला बोलण्याची संधी दिली जाऊ नये. कोणाला माझा आवाज का दाबायचा आहे?”
- “मी टोल प्लाझाची लूट, बँकांचे चार्जेस, झोमॅटो-ब्लिंकिट रायडर्सच्या समस्या आणि मध्यमवर्गीयांवरील कराचा बोजा यावर आवाज उठवला. यामुळे ‘आप’चे काय नुकसान झाले?”
टेलिकॉम कंपन्यांच्या लुटीवरही रोखठोक भाष्य
संसदेत त्यांनी उपस्थित केलेले काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. एअरपोर्टवर मिळणारे महागडे अन्न, अन्नातील भेसळ, टेलिकॉम कंपन्या १२ महिन्यांत १३ वेळा रिचार्ज कसं करून घेतात आणि रिचार्ज संपल्यावर इनकमिंग कॉल का थांबवले जातात, यांसारख्या विषयांवर त्यांनी आवाज उठवला होता.
‘आप’मधील मोठा संघटनात्मक बदल
आम आदमी पार्टीने नुकताच राज्यसभेत मोठा बदल केला आहे. राघव चड्डा यांना उपनेते पदावरून हटवून त्यांच्या जागी अशोककुमार मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चड्डा यांनी व्हिडिओच्या शेवटी म्हटले आहे की, “मी तो सागर आहे, जो वेळ आल्यावर वादळ बनतो.” त्यांच्या या विधानामुळे ‘आप’ अंतर्गत गटबाजी किंवा नाराजी उघडपणे समोर आल्याचे मानले जात आहे.
राघव चड्डा यांचा आतापर्यंतचा प्रवास:
- २०२० – २०२२: दिल्ली विधानसभेचे आमदार आणि दिल्ली जल बोर्डाचे सदस्य.
- एप्रिल २०२२: पंजाबमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड.
- ओळख: पक्षाचा तरुण, सुशिक्षित आणि तार्किक बाजू मांडणारा चेहरा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:05 03-04-2026














