सिंधुदुर्ग: आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेत असणारे राज्याचे मंत्री नितेश राणे सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. जैन मुनी निलेशचंद्र यांनी नितेश राणे यांची तुलना चक्क छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानंतर, राणेंनी अत्यंत नम्रपणे पण स्पष्ट शब्दांत ही तुलना फेटाळून लावत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नेमका वाद काय?
जैन मुनी निलेशचंद्र यांनी नितेश राणे यांच्या कार्याचे कौतुक करताना त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा दिली होती. “नितेश राणे यांची भूमिका बाळासाहेब ठाकरेंसारखी आक्रमक आहे आणि त्यांची उंची महाराजांसारखीच आहे,” असे गौरवोद्गार मुनींनी काढले होते. इतकेच नाही तर, राणेंनी राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती.
नितेश राणेंची रोखठोक प्रतिक्रिया
या विधानावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले की,
“छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगातील कोणाशीही होऊ शकत नाही. ती कोणालाही शक्य नाही. त्यामुळे कोणी आपली वैयक्तिक भावना व्यक्त केली असली, तरी ती आम्हाला मान्य नाही. मी या वक्तव्यावर सभेनंतर माझी नाराजी व्यक्त केली आहे.”
मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर बोलताना त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. “राज्याला सध्या अत्यंत कर्तबगार मुख्यमंत्री लाभले असून, पुढची २५ वर्षे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील,” असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी!
अजितदादा पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर होत असलेल्या पोटनिवडणुकीबाबत राणेंनी भावनिक साद घातली. “अजितदादांचे सर्वच पक्षांशी सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर ही निवडणूक लढवण्याची किंवा राजकारण करण्याची वेळ नाही. त्यामुळे ही पोटनिवणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे,” असे ते म्हणाले.
खरात प्रकरणावर अंजली दमानिया यांना प्रत्युत्तर
एकनाथ शिंदे यांच्यावर अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांनंतर नितेश राणेंनी SIT चौकशीचा दाखला दिला.
- “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणासाठी SIT नेमली आहे.”
- “ही केस अनेक माता-भगिनींच्या भविष्याशी निगडित असल्याने पोलीस बारकाईने तपास करत आहेत.”
- “ज्यांना आरोप करायचे आहेत, त्यांनी थेट SIT शी संवाद साधावा,” असा टोलाही त्यांनी लगावला.
मुंब्राचे नाव ‘मुंबादेवी’ करण्याचा निर्धार
शेवटी, मुंब्रा शहराच्या नामांतराबाबत नितेश राणेंनी आपला निर्धार पुन्हा बोलून दाखवला. “मुंब्राचे नाव मुंबादेवी व्हावे ही तिथल्या स्थानिक लोकांची भावना आहे. ही भावना मी सरकारपर्यंत पोहोचवली असून, यापुढेही या नामांतरासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:30 04-04-2026














