राजापूरच्या सौंदळमध्ये घरगुती वादातून रक्ताची नाती भिडली; चुलत्याचा पुतण्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील सौंदळ, भालेकरवाडी येथे घरगुती वादातून एका चुलत्याने आपल्या पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पुतण्या गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वादाचे नेमके कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तुकाराम गोपाळ चव्हाण (वय ७२) यांचे त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत घरगुती कारणावरून भांडण सुरू होते. यावेळी फिर्यादी यांचा भाऊ आणि आरोपी दशरथ गोपाळ चव्हाण हा त्यांच्या घरी आला. “तुमची रोजची भांडणे का असतात? तुझी बायको आमची खानदान का काढते?” असे विचारत त्याने जुन्या गोष्टी उकरून काढल्या.

या वादात फिर्यादी यांचा मुलगा नरेंद्र चव्हाण (वय ३२) याने मध्यस्थी करत “तुम्ही इथे का आलात, तुमचा काय संबंध?” असे विचारले. याचा राग आल्याने आरोपी दशरथ याने हातातील बॅटरीने नरेंद्रच्या डोक्यावर प्रहार केला आणि शिवीगाळ करत आपल्या घरी निघून गेला.

कुऱ्हाडीने केला वार

आरोपी आपल्या घराकडे जाऊनही शिवीगाळ करत असल्याने, नरेंद्र त्याला विचारणा करण्यासाठी त्याच्या अंगणात गेला. यावेळी आरोपी दशरथ चव्हाण याचा राग अनावर झाला आणि त्याने अंगणात ठेवलेली लाकडी दांड्याची लोखंडी कुऱ्हाड उचलून थेट नरेंद्रच्या डोक्यावर मारली. या हल्ल्यात नरेंद्रच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.


पोलिसांत गुन्हा दाखल

या घटनेनंतर तुकाराम गोपाळ चव्हाण यांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी ५ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ०२:०६ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.

दाखल कलमे:

  • कलम ११८(१): धोकादायक शस्त्राने दुखापत करणे.
  • कलम ३५२: शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे.
  • कलम ३५१(१), ३५१(२): फौजदारी पात्र धाकधपटशा दाखवणे.

या घटनेचा अधिक तपास राजापूर पोलीस करत असून, सख्ख्या भावांच्या वादात पुतण्यावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे सौंदळ परिसरात खळबळ माजली आहे.