रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे ५ एप्रिल रोजी आयोजित सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांचा संगीताचा कार्यक्रम संभाव्य पावसामुळे रद्द करण्यात आला. मात्र, या निर्णयाची अधिकृत सूचना प्रेक्षकांपर्यंत वेळेत न पोहोचल्याने रविवारी सायंकाळी मैदानावर मोठा गोंधळ उडाला. बाहेरगावाहून आलेल्या रसिक प्रेक्षकांनी आयोजक आणि तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म विरुद्ध तीव्र रोष व्यक्त करत पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
महेश काळे यांचा हा गायनाचा कार्यक्रम ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता होणार होता. मात्र, कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ३० मार्च रोजीच हा कार्यक्रम रद्द करून ‘बुक माय शो’ (BookMyShow) या ऑनलाइन प्लॅटफॉर्मला कळवले होते. तरीही, अनेक प्रेक्षकांना याबाबत कोणताही मेसेज किंवा ई-मेल न मिळाल्याने ते नियोजित वेळेला कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले.
आयोजक गायब, रसिक प्रेक्षकांचा संताप
रविवारी संध्याकाळी ७ वाजता जेव्हा प्रेक्षक प्रमोद महाजन क्रीडा संकुलावर पोहोचले, तेव्हा तिथे कार्यक्रमाची कोणतीही तयारी नव्हती आणि आयोजकांपैकी कोणीही उपस्थित नव्हते. यामुळे प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी केवळ रत्नागिरीतूनच नव्हे, तर पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथूनही अनेक रसिक आले होते.
पोलिसांत लेखी तक्रार आणि नुकसान भरपाईची मागणी
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून घटनास्थळी पोलीस दाखल झाले. संतप्त प्रेक्षकांनी केवळ तिकीटाचे पैसेच नव्हे, तर बाहेरगावाहून येण्या-जाण्याचा खर्च आणि रत्नागिरीत राहण्यासाठी झालेला खर्च याचीही नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात उपस्थित दर्शकांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही दिली आहे.
आयोजक गांधार जोग यांचे स्पष्टीकरण
या गोंधळाबाबत माहिती देताना आयोजक गांधार जोग म्हणाले, “आम्ही संभाव्य पावसामुळे कार्यक्रम रद्द केला होता आणि त्याबद्दल ‘बुक माय शो’ला कळवले होते. सुमारे ३० टक्के बुकिंग झाले होते. ज्यांनी ऑफलाइन बुकिंग केले होते, त्यांचे पैसे आम्ही परत केले आहेत. ‘बुक माय शो’च्या माध्यमातून झालेल्या बुकिंगचे पैसे पुढील दोन दिवसांत परत करावेत, असे आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.”
‘बुक माय शो’च्या कारभारावर प्रश्नचिन्ह
वेळेवर सूचना न मिळाल्यामुळे अनेक पर्यटकांना आणि स्थानिक रसिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. “आम्ही इतक्या दुरून केवळ महेश काळेंचे गायन ऐकण्यासाठी आलो होतो, पण इथे आल्यावर कळतेय की कार्यक्रमच नाही. आमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया गेले आहेत,” अशी भावना कोल्हापूरहून आलेल्या एका रसिकाने व्यक्त केली.
आता ऑनलाइन बुकिंग केलेले प्रेक्षक त्यांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा करत असून, भविष्यात अशा मोठ्या कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत आयोजकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.













