रत्नागिरी/खेड: “देशातील ओबीसी समाजाला सातत्याने दुर्लक्षित करण्याचे धोरण आता सहन केले जाणार नाही,” असा कडक इशारा देत ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना तत्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात कुणबी समाजोन्नती संघ (खेड शाखा) आणि ओबीसी-व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.
कोकणात एकाच वेळी साखळी निवेदने
ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी कोकणातील सातही जिल्ह्यांतील तहसीलदार कार्यालयांवर एकाच वेळी निवेदने सादर करून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना (Column) असावा, ही प्रमुख मागणी या आंदोलनाद्वारे लावून धरण्यात आली आहे.
जनगणनेच्या प्रश्नावलीत ‘अनुक्रमांक १२’ चा मुद्दा कळीचा
केंद्र सरकारने २३ एप्रिल २०२५ रोजी मंत्रिमंडळात जनगणनेबाबत घोषणा केली होती. मात्र, ओबीसी समाजाच्या स्वतंत्र नोंदीबाबत अद्यापही कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही, याबद्दल संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्या मांडण्यात आल्या आहेत:
- स्वतंत्र समावेश: एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीत बदल करावा.
- अनुक्रमांक १२ चा बदल: प्रश्नावलीतील अनुक्रमांक १२ मध्ये अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रमाणेच इतर मागास वर्गाचा (OBC) स्वतंत्र समावेश करणे अनिवार्य आहे.
- अचूक आकडेवारी: ओबीसींची नेमकी लोकसंख्या समोर आल्याशिवाय त्यांना न्याय्य हक्क मिळणार नाहीत, अशी भूमिका मांडण्यात आली.
“आता सहन करणार नाही”; तीव्र आंदोलनाचा इशारा
“जर ओबीसींचे घटनात्मक हक्क हिरावले गेले, तर राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशारा यावेळेस उपस्थित नेत्यांनी दिला. यावेळी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष कृष्णा आग्रे, ओबीसी-व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष दीपक शिगवण, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर यांच्यासह रामचंद्र आईनकर, भिकू जाधव, श्याम गवळी, ज्ञानेश्वर खांबे, छगन म्हादे, विजय धुलप आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
जनगणनेचा टप्पा आणि ओबीसींची भूमिका
२०२७ च्या जनगणनेचा पहिला टप्पा एप्रिल २०२६ पासून सुरू होत असतानाच, ओबीसी समाजाने आपली शक्ती दाखवण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात या मागणीने आता जोर धरला असून, केंद्र सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 06-04-2026














