रत्नागिरी जिल्ह्यातील १८ शाळा ‘कायम अपात्र’; राज्य शासनाचा मोठा दणका

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. वारंवार होणाऱ्या मूल्यमापन प्रक्रियेत निकषांची पूर्तता न करणाऱ्या जिल्ह्यातील १८ शाळा आणि कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या २ तुकड्यांना राज्य शासनाने कायमस्वरूपी अपात्र घोषित केले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील खाजगी शाळा व्यवस्थापनांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी कारवाई काय?

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २ एप्रिल रोजी सुधारित निकषांनुसार राज्यातील शाळांचे मूल्यमापन केले. यामध्ये रत्नागिरीसह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांवरही कारवाईचा बडगा उचचला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कारवाईची आकडेवारी:

  • एकूण अपात्र संस्था: १८
  • उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालये: ११
  • प्राथमिक शाळा:
  • अपात्र तुकड्या:

या प्राथमिक शाळांवर झाली कारवाई (ता. चिपळूण व खेड):

१. रामचंद्र पाटणे ज्ञानदीप विद्यामंदिर, भडगाव (ता. खेड). २. एसपीएम इंग्लिश प्राथमिक शाळा (ता. चिपळूण). ३. सह्याद्री शिक्षण संस्था प्राथमिक शाळा, सावर्डे (ता. चिपळूण). ४. लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे प्राथमिक विद्यालय, कामथे (ता. चिपळूण). ५. एमआयएकजी प्राथमिक शाळा, खेड.


पगार आणि अनुदानाचा प्रश्न ऐरणीवर

ज्या शाळा आणि तुकड्या अपात्र ठरल्या आहेत, त्यांना आता वेतन अनुदान (Salary Grant) मिळणार नाही. नियमानुसार, मूल्यमापनात अपात्र ठरलेल्या शाळेची मान्यता आपोआप रद्द होऊ शकते किंवा त्यांना ‘स्वयं अर्थसहाय्यित’ तत्त्वावर शाळा चालवावी लागणार आहे. यासाठी शिक्षण संस्थांना वेळेत अर्ज करणे बंधनकारक असेल, अन्यथा त्यांची मान्यता धोक्यात येईल.


“कायम विना अनुदान तत्त्वावर मान्यता दिलेल्या आणि मूल्यमापन निकषांत अपात्र ठरलेल्या ५ शाळांवर प्राथमिक विभागात कारवाई झाली आहे. ही कारवाई राज्य शासनाच्या धोरणानुसार करण्यात आली आहे.” — निलिमा नाईक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, रत्नागिरी.


खाजगी शाळा संघटना आक्रमक!

शासनाच्या या जाचक अटी आणि शाळांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयामुळे खाजगी शाळांच्या संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे परिपत्रक तात्काळ मागे घ्यावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षण संस्था चालकांनी दिला आहे.

कारवाईचे परिणाम:

  • शाळांच्या मान्यतेवर टांगती तलवार.
  • शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर.
  • ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता.

या निर्णयामुळे आता जिल्ह्यातील शिक्षण संस्थांचे भवितव्य काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:32 07-04-2026