संगमेश्वर : माखजन बसस्थानकात खड्डे अन् दलदल

सावर्डे : संगमेश्वर तालुक्यातील माखजन खाडीपट्ट्यातील महत्त्वाचे बसस्थानक म्हणून माखजन बसस्थानकाकडे पहिले जाते; मात्र चिखल, गाळ, दलदल, मोठे खड्डे, तलावसदृश सांडपाणी, बांधकामाची पडझड, एसटी प्रशासनाचा चालढकल कारभार आदी कारणांनी बसस्थानकाची दयनीय अवस्था झाली आहे.

माखजन बसस्थानक प्रवेशदारातच लांबच्या लांब खड्डे व चिखल गाळासह दलदल झाली आहे. बाजूची संरक्षक भिंत ढासळली असून, कामाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे तसेच अंतर्गत पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीच कायमस्वरूपी उपाययोजना किंवा नाला नसल्याने पाणी बसस्थानकासमोर साचून राहते. त्यामुळे ग्रामस्थ व प्रवाशीवर्गासह चालक व वाहकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. बाजूला गवताचे साम्राज्य असल्याने बसस्थानकाची समस्या गंभीर बनत आहे. मागील पाच वर्षांपासून माखजन बसस्थानकासमोर दर पावसाळ्यात पाणी साचले जाते. आवाराला तलावाचे स्वरूप येते. आजही स्थिती कायम आहे. त्यातून शालेय विद्यार्थी व महिलावर्ग मार्ग काढत जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. दरदिवशी या बसस्थानकामधून कोल्हापूर, मुंबई, देवरूख, पुणे, रत्नागिरी, चिपळूण आदी ठिकाणी ४०हून अधिक बसफेऱ्या ये-जा करत असतात. दररोज शेकडो प्रवासी आणि विद्यार्थी बसस्थानकात उपस्थित असतात. देवरूख एसटी आगाराच्या कार्यक्षेत्रातील साखरपापाठोपाठ माखजन हे बसस्थानक रहदारीच्यादृष्टीने महत्त्वाचे बसस्थानक आहे.

एसटीला मोठा आर्थिक हातभार मिळतो. तरीही एसटी प्रशासनाचे या स्थानकाच्या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष होत आहे. एसटी प्रशासनाने लक्ष घालून स्थानकाच्या समस्या सोडवून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

माखजन बसस्थानकात दररोज शेकडो प्रवासी ये-जा करतात. गणपती सणाला मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येतात. त्या चाकरमान्यांचे फूटभर खड्क्यातून स्वागत होते. अनेकदा एसटीच्या ढिसाळ कारभाराबद्दल तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नाही. – अमोल रेडिज, सामाजिक कार्यकर्ते, माखजन

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 31/Oct/2024