संगमेश्वर: उन्हाळ्याची चाहूल लागताच कोकणातील अनेक गावांना पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे (प्रभाग २) येथील पाणी समस्या आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचली असून, प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या १५ दिवसांत गाव तळीचे रखडलेले काम सुरू न झाल्यास ८ मे २०२६ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेवर भव्य ‘हंडा मोर्चा’ काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
पाणी आटलं, पण आश्वासनं आटली नाहीत!
असुर्डे प्रभाग २ मधील मणवेवाडी, पाताडेवाडी, गुरववाडी, कुळ्येवाडी आणि लोहारवाडी या पाच वाड्यांना ‘बोडकीचा बंधारा’ येथून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात या बंधाऱ्यातील पाणी पूर्णपणे आटते. अशा परिस्थितीत ग्रामस्थांना ‘गाव तळी’ या एकमेव पर्यायी स्त्रोतावर अवलंबून राहावे लागते.
जलजीवन मिशनचा फज्जा; खोदकामामुळे नैसर्गिक स्त्रोतही बुजले
मिळालेल्या माहितीनुसार, जल जीवन मिशन अंतर्गत या तळीच्या कामाचे खोदकाम मे २०२५ मध्ये करण्यात आले होते. मात्र, वर्ष उलटून गेले तरी हे काम अद्याप बंदच आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कंत्राटदाराने अर्धवट खोदकाम करून ठेवल्यामुळे या तळीतील जुना नैसर्गिक पाण्याचा स्त्रोतही बंद झाला आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
“आम्ही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी देखील मी स्वतः उपोषणाचा इशारा दिला होता, तरीही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे नैसर्गिक स्त्रोतही बाधित झाले आहेत. आता सहनशक्ती संपली असून १५ दिवसांत काम सुरू न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही.” — प्रदीप शिंदे, सरपंच, मौजे असुर्डे
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:
१. गाव तळीचे रखडलेले बांधकाम युद्धपातळीवर त्वरित पूर्ण करावे. २. बोडकीचा बंधारा व जॅकवेलमधील साचलेला गाळ तात्काळ काढण्यात यावा. ३. पाणी स्त्रोत बळकट करण्यासाठी जलसंधारणाची कामे आणि नवीन पाझर तलाव बांधण्यात यावा.
प्रशासनाला निवेदनाद्वारे निर्वाणीचा इशारा
या संदर्भात प्रदिप शंकर शिंदे, अशोक सोनू तांबे यांच्यासह ५० हून अधिक ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), पालकमंत्री, खासदार आणि स्थानिक आमदारांना पाठवण्यात आले आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास ८ मे रोजी होणारा ‘हंडा मोर्चा’ अधिक तीव्र असेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असताना, आता असुर्डे ग्रामस्थांच्या या इशाऱ्याला प्रशासन कशा प्रकारे प्रतिसाद देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:34 09-04-2026












