रत्नागिरीत शरीरसौष्ठवपटूंचा महाकुंभ! ७२ वी राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा १ आणि २ मे रोजी; ‘भारत श्री’चा थरार रंगणार

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. ना. श्री. उदयजी सामंत प्रतिष्ठानरत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने ७२ व्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. १ आणि २ मे २०२६ रोजी रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. श्री. श्रीराम हरी खातू नाट्य मंदिरात हा थरार रंगणार आहे.

२५० हून अधिक दिग्गज शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग

या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून सुमारे २५० नामवंत शरीरसौष्ठवपटू रत्नागिरीत दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत संघ व्यवस्थापक, पंच आणि पदाधिकारी मिळून सुमारे ३५० जणांची उपस्थिती असणार आहे. नॅशनल फिटनेस अँड बॉडी बिल्डिंग फेडरेशन (IF-BF) यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होत असून, यानिमित्ताने राष्ट्रीय पंच परीक्षेचेही आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेचे स्वरूप आणि आकर्षण

या दोन दिवसीय महोत्सवात एकूण ८ विविध गटांत स्पर्धा रंगणार आहेत. यामध्ये खालील किताबांचा समावेश आहे:

  • भारत श्री
  • भारत किशोर
  • भारत कुमार
  • भारत उदय
  • भारत श्रीमान
  • मेन फिजिक्स
  • क्लासिक फिजिक्स
  • जीन मॉडेल

यापैकी ४ स्पर्धा १ मे रोजी, तर उर्वरित ४ स्पर्धा २ मे रोजी पार पडतील. एकूण १० मुख्य टायटल्स दिली जाणार असून, प्रत्येक अंतिम विजेत्याला भव्य ट्रॉफी, मानाचा पट्टा, मेडल आणि भरघोस रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच प्रत्येक गटातील पहिल्या ६ क्रमांकांना सन्मानचिन्ह आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

खेळाडूंसाठी शाही सोय

पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने रत्नागिरीत क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे. या स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि पंचांची निवास, भोजन आणि वाहतुकीची व्यवस्था आयोजकांतर्फे पूर्णपणे विनामोबदला करण्यात आली आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. विरेंद्र वणजू कामकाज पाहत असून, त्यांना अध्यक्ष सदानंद जोशी, सेक्रेटरी जितेंद्र नाचणकर आणि सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

भव्य उद्घाटन आणि समारोप

  • उद्घाटन: १ मे २०२६, सायंकाळी ५:०० वाजता – ना. डॉ. उदयजी सामंत आणि राजापूरचे आमदार मा. किरण सामंत यांच्या शुभहस्ते.
  • बक्षीस वितरण: २ मे २०२६, रात्री १०:०० वाजता.

रत्नागिरी: क्रीडा पंढरीच्या दिशेने

ना. उदय सामंत यांच्या आर्थिक व वैयक्तिक सहकार्यामुळे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान आणि MIDC क्षेत्रात भव्य स्टेडियमचे काम पूर्णत्वास येत आहे. केवळ स्पर्धाच नव्हे, तर खेळाडूंना अत्याधुनिक साहित्य आणि मैदाने उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा देखील ‘भव्य आणि दिव्य’ स्वरूपात पार पडणार असून, सर्व व्यायाम प्रेमी, विद्यार्थी आणि क्रीडा संस्थांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.