पंतप्रधान मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी

नवी दिल्ली : देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गुजरातच्या कच्छमध्ये आले आहेत.

दिवाळीनिमित्त सैनिकांना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदींनी स्वत:च्या हाताने त्यांना मिठाई खाऊ घातली आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच गुजरातमध्ये
केवडिया येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना पुष्पांजली अर्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदी कच्छमध्ये पोहोचले. दरम्यान, पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच गुजरातमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यापूर्वी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरातच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती.

गेल्यावर्षी हिमाचलमध्ये
पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. तर, 2022 च्या दिवाळीला पीएम मोदी कारगिलमध्ये होते. त्यावेळी त्यांनी 1999 च्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली होती. विशेष म्हणजे, पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी सलग 11व्यांदा सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत.

पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत कुठे-कुठे दिवाळी साजरी केली?

वर्ष 2014: पंतप्रधान मोदींनी सियाचीनमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.
वर्ष 2015: पाकिस्तान सीमेवर सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.
वर्ष 2016: हिमाचल प्रदेशात सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.
वर्ष 2017: बांदीपोरा, जम्मू आणि काश्मीरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.
वर्ष 2018: उत्तरकाशी, उत्तराखंडमध्ये ITBP सोबत दिवाळी साजरी केली.
वर्ष 2019: राजौरी, जम्मू आणि काश्मीरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.
वर्ष 2020: राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.
वर्ष 2021: जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.
वर्ष 2022: कारगिलमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.
वर्ष 2023: हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:44 31-10-2024