रत्नागिरी (पूर्णगड): रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरूपानंद मंदिर परिसरात एका दुकानदाराने मजुराला लोखंडी शिगेने अमानुष मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात संबंधित दुकानदारावर भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयदास कृष्णा मांडवकर (वय ४५, रा. नालेवठार मधलीवाडी, पावस) हे मोलमजुरीचे काम करतात. सोमवार, ८ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:३० ते ८:४५ च्या सुमारास मांडवकर आपले काम आटपून पावस-जुवीवाडी येथील घरी जात होते.
ते स्वामी स्वरूपानंद मंदिरासमोरील विजय देसाई यांच्या दुकानाच्या रांगेत असलेल्या ‘शरयु शॉपी’ समोर आले असता, दुकानाचे मालक आरोपी शरयु गणेश सुर्वे (वय ४३, रा. रनपार सुर्वेवाडी) यांनी कोणत्यातरी जुन्या गोष्टीचा मनात राग धरून मांडवकर यांना अडवले.
लोखंडी शिगेने प्राणघातक हल्ला
शाब्दिक चकमकीचे रूपांतर गंभीर वादात झाले. यावेळी आरोपी शरयु सुर्वे याने दुकानातील एक लोखंडी शीग हातात घेऊन फिर्यादी मांडवकर यांच्यावर हल्ला चढवला. या मारहाणीत मांडवकर यांच्या डोक्यावर, कानावर, हातावर, पायावर आणि बरगडीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. भररस्त्यात झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल
जखमी जयदास मांडवकर यांनी याप्रकरणी गुरुवारी (९ एप्रिल) पहाटे ३:०१ वाजता पूर्णगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आरोपी शरयु गणेश सुर्वे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१) (धोकादायक शस्त्राने दुखापत करणे), ३५१(२) आणि ३५१(३) नुसार गुन्हा नोंदवला आहे (गु.र.नं. २२/२०२६).
पुढील तपास पूर्णगड पोलीस करत असून, किरकोळ कारणावरून अशा प्रकारे हिंसक वळण लागल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.














