दापोली : दिवाळीनिमित्त चिमुकल्यांनी रेखाटल्या रांगोळ्या, बनवल्या वस्तू

दापोली : शाळेतल्या चिमुकल्यांचे हात मातीने माखलेले होते. काही विद्यार्थी रांगोळीच्या रंगाने तसेच वॉटरकलरमध्ये रंगलेले, याचं कारण होतं जो तो विद्यार्थी दिवाळीनिमित्त किल्ला बनवणे, रांगोळी काढणे, चित्र रंगवणे, कंदील बनवणे आदी गोष्टींत गुंतून राहिलेले आहेत. मोबाईलमध्ये रमलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ब्रिलियंट स्कूल अॅकॅडमी संचलित रामराजे इंटरनॅशनल स्कूल आणि मराठा विद्यामंदिरने ही अनोखी संकल्पना राबवली होती. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते.

दिवाळी सर्वत्र उत्साहात साजरी होते. त्यातही महाराष्ट्राच्या दिवाळीचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे दिवाळीशी असलेला किल्ल्यांचा संबंध. महाराष्ट्रात किल्ल्यांचं आणि दिवाळीचं एक अतूट नातं आहे. किल्ला म्हणजे दिवाळी आणि दिवाळी म्हणजेच किल्ला, असे जणू समीकरणच तयार झाले आहे. दापोली शहरातील ब्रिलियंट स्कूल अॅकॅडमी संचलित रामराजे इंटरनॅशनल स्कूल आणि मराठा विद्यामंदिर दापोली या शाळेतीत चिमुकल्यांची किल्ला बनवणे, कंदील बनवणे, रांगोळ्या काढणे, चित्र रंगवणे, पणत्या रंगवणे या गोष्टींची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वेळी विद्यार्थ्यांना स्वतःची वस्तू बनवण्यासाठी स्वतः साहित्य घेऊन येण्यास सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी ज्या ज्या गोष्टींमध्ये सहभाग घेतला होता त्या त्या वस्तू विद्यार्थी घेऊन आले आणि कोणी किल्ला बनवू, लागले तर कोणी रांगोळ्या काढत होते. कोणी पणत्या रंगवत होते. या सर्व गोष्टी करताना विद्यार्थ्यांची मोठी लगबग सुरू होती. दरम्यान. किल्ला बनवताना खूपच मज्जा आली असल्याचे चिमुकल्यांनी सांगितले, विद्यार्थ्यांनी रायगड, राजगड, वज्रगड, शिवनेरी आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवल्या होत्या. या स्पर्धेत १ ली ते ७ वीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षकांनीदेखील सहभाग घेतला होता.

विद्यार्थ्यांना लहान वयात गडकिल्ले व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास याची माहिती व्हावी, त्याचे महत्व समजावे या हेतूने दिवाळीनिमित्त उपक्रम राबवण्यात आला आहे. किल्ला बनवण्याबरोबरच कृतीयुक्त शिक्षणाच्या माध्यमातून इतिहास शिकवत आहोत, तसेच दिवाळी सणात आपलं घर कसे सजवायचे, दिवाळी साहित्य कसे बनवायचे, आदी माहिती प्रात्यक्षिकातून दिली गेली आहे. शेखर पाटील, अॅकॅडमीचे प्रमुख

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 31/Oct/2024