रत्नागिरी: तालुक्यातील कोतवडे उंबरवाडी येथे एका ३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गुरुवारी (९ एप्रिल) दुपारी ही घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
आई-वडील कामावर असताना उचलले टोकाचे पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश रवींद्र पवार (वय ३७) हा तरुण आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्याचे वडील रवींद्र पवार हे सडये गावी गवंडी कामासाठी गेले होते, तर आई अंगणवाडीतील कामासाठी घराबाहेर गेली होती. घरात कोणीही नसल्याची संधी साधून शैलेशने हॉलमधील लाकडी वाशाला (बाराला) दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.
असा उघड झाला प्रकार
दुपारी आई कामावरून घरी परतली तेव्हा घराचे दरवाजे आणि खिडक्या आतून बंद असल्याचे तिच्या लक्षात आले. काही वेळाने वडीलही कामावरून परतले. त्यांनी घराच्या मागील दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश केला असता, समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. शैलेशने हॉलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला.
कारणाची शोध सुरू
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शैलेशने नेमक्या कोणत्या विवंचनेतून किंवा कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मुलाच्या या अचानक जाण्याने पवार कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलीस कारवाई
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी बी.एन.एस.एस. (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवाराकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
महत्त्वाची टीप: नैराश्य किंवा मानसिक तणावाखाली असाल तर कृपया कोणाशी तरी बोला. संवाद हा अनेक समस्यांवर उपाय ठरू शकतो. जिल्हयातील मदतीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 11-04-2026














