खेडमध्ये ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ दवाखान्याचे उद्घाटन; सर्वसामान्यांना मिळणार स्वस्त आरोग्य सेवा

खेड: खेड शहर आणि परिसरातील गरजू रुग्णांना माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी खेड नगरपरिषद आणि घरडा हॉस्पिटल (लवेल) यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ दवाखान्याचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. राज्याचे गृह, महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या हस्ते या दवाखान्याचे भव्य उद्घाटन पार पडले.

आरोग्य सेवा हा नागरिकांचा हक्क

उद्घाटन प्रसंगी बोलताना ना. योगेश कदम म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर आणि परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. खेड नगरपरिषद आणि घरडा हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकीतून सुरू केलेला हा आरोग्य प्रकल्प खेडच्या इतिहासात ‘मैलाचा दगड’ ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या मान्यवरांची होती उपस्थिती

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केले. या सोहळ्याला प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती, ज्यात प्रमुख उपस्थिती खालीलप्रमाणे होती:

  • वैशाली पाटील: प्रांताधिकारी
  • सुधीर सोनवणे: तहसीलदार
  • माधवी बुटाला: नगराध्यक्षा
  • सतिश वेंगोली: विश्वस्त, घरडा फाऊंडेशन
  • डॉ. फिरोज पटेल: आरोग्य तज्ज्ञ
  • तोसिफ खोत: आरोग्य सभापती, नगरपरिषद
  • निकेतन पाटणे: गटनेते

रुग्णांना काय होणार फायदा?

या दवाखान्यामुळे खेड शहरातील मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना खासगी रुग्णालयांच्या महागड्या खर्चापासून दिलासा मिळणार आहे. घरडा हॉस्पिटलच्या तांत्रिक सहकार्यामुळे येथे तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आणि प्राथमिक उपचारांची सुविधा माफक दरात उपलब्ध होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:31 11-04-2026