धक्कादायक : सावकारी कर्ज आणि आजारपणाला कंटाळून रत्नागिरीतील प्रसिद्ध आंबा व्यापाऱ्याची आत्महत्या

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील तोणदे गावचे माजी उपसरपंच आणि प्रसिद्ध आंबा व्यापारी रुपेश नागवेकर यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि आंबा बागायतदारांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश नागवेकर हे तोणदे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते शारीरिक आजारपण आणि मोठ्या आर्थिक विवंचनेत होते. याच नैराश्यातून त्यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःच्याच बंदुकीने गोळ्या झाडून घेत आपले जीवन संपवले.

सावकारी जाच आणि बँकेचे कर्ज

​नागवेकर यांच्या आत्महत्येचे पडसाद आता उमटू लागले आहेत. खासगी सावकारांच्या कर्जाचा वाढता दबाव आणि त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासामुळेच रुपेश यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याशिवाय, एका नामांकित बँकेचे कर्जदेखील त्यांच्यावर होते. या दुहेरी आर्थिक संकटामुळे ते गेल्या काही काळापासून प्रचंड मानसिक दडपणाखाली होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पोलीस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात सावकारी जाचाचा जो आरोप होत आहे, त्या दिशेने पोलीस अधिक तपास करत आहेत. नागवेकर यांच्या पश्चात मोठा परिवार असून त्यांच्या जाण्याने तोणदे गावावर शोककळा पसरली आहे.