रत्नागिरी : नुकतेच फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी येथील मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागातील ४ विद्यार्थ्यांची टेक्निमाँट या नामांकित कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे.
ह्या विद्यार्थ्यांमध्ये कु. मिसबा काझी, कु. अदिती श्रोत्री, कु. जयेश पार्टे, कु. निनाद ताम्हणकर यांचा समावेश आहे. ही निवड फिनोलेक्स अॅकॅडमीसाठी एक मोठे यश असून, विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता आणि तांत्रिक कौशल्य दाखवत कंपनीच्या कॅम्पस रिक्रूटमेंट प्रक्रियेत यश संपादन केले आहे.
टेक्निमाँट कंपनी जगभरातील प्रमुख औद्योगिक प्रकल्पांमध्ये आपले योगदान देत असून, ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, इन्फ्रास्ट्रक्चर आणि केमिकल्स या क्षेत्रांत विशेष ओळखली जाते. भारतातील प्रमुख प्रकल्पांमध्ये भागीदारी करीत असलेल्या या कंपनीच्या विविध शाखा कार्यरत आहेत. कंपनीच्या उच्च दर्जाच्या तांत्रिक सेवेमुळे आणि जगभरातील प्रकल्पांमध्ये सहभागामुळे टेक्निमाँट विद्यार्थ्यांसाठी एक आकर्षक करिअरची संधी ठरली आहे.
फिनोलेक्स अॅकॅडमीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट टीमने प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी विविध प्रयत्न केले आहेत. महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच नियमित अॅप्टीट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन, आणि इंटरव्ह्यूचे ट्रेनिंग दिले जाते. या संपूर्ण प्रक्रियेचा एक भाग म्हणून, विद्यार्थी नोकरीसाठी अधिक तयार होतात आणि त्यांचे संपूर्ण व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जातो. फिनोलेक्स अॅकॅडमी आपल्या विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील उच्च गुणवत्तेच्या संधी देण्यासाठी नेहमीच तत्पर असते, आणि यापुढेही विद्यार्थ्यांच्या यशासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहणार आहे.
या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा डॉ. श्रीमती अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद आणि अॅकॅडमीच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:47 31-10-2024














