चिपळूण : राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर रस्तेकामांसह विविध विकासकामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारांची स्वतंत्र समिती नेमून चौकशी केली जाईल आणि संबंधित विकासकामे चांगल्या दर्जाची करून भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या संबंधितांवर योग्य कार्यवाही केली जाईल. आपल्या आयुष्यात चिपळूण-पाटण रस्त्याइतका खराब रस्ता प्रथमच पाहिल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगून या रस्त्यांच्या कामासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे चिपळुणातील पत्रकार परिषदेत सांगितले.
सोमवारी (दि. २३) पक्षाचे नेते शरदचंद्र पवार यांची सहकार भवन येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी आ. रमेश कदम यांच्यासह सरचिटणीस प्रशांत यादव, नलिनी भुवड, जिल्हाध्यक्ष सुरेश बने उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर पवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या जागावाटप संदर्भात अजूनही अंतीम निर्णय झालेला नाही. याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना ते म्हणाले आणीबाणीनंतर देशातील जनतेचा आवाज ऐकून सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. त्यावेळी पंतप्रधानपदासाठी मोरारजी देसाई यांचा चेहरा विरोधकांनी कधीही समोर ठेवला नाही. केवळ एकत्र येऊन चांगले काम करून दाखविण्याचा विश्वास आम्ही जनतेत निर्माण केला आणि जनतेने आमच्यावर विश्वास दाखविला.
तोच विश्वास आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जनतेमध्ये जाऊन निर्माण करणार आहोत. आम्ही लोकांना असा विश्वास देत आहोत की, राज्याच्या हितासाठी काम करणारे सरकार स्थापन करणार. आता जनतेची मानसिकताही आम्हाला साथ देण्याची आहे.
मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठीचे उपोषण हे केवळ मराठा समाजासाठी नाही. कारण मराठा समाज हा सर्व जाती-धर्मातील समाजाला सोबत घेऊन जाणारा आहे. रयतेचे राज्य करणारा आहे. हे या समाजाचे वैशिष्ट्य आहे. जरांगे यांची भूमिका ही अशीच सर्वसमावेशक असून आरक्षणामध्ये त्यांनी केवळ मराठा समाज ही भूमिका न मांडता इतर सर्व जाती-जमातीमधील छोट्या घटकांना आरक्षण मिळावे, अशी भूमिका आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला पाठिंबा आहे, वक्फ विधेयक संदर्भात भूमिका मांडताना, केंद्र सरकार एका दिवसामध्ये घाईघाईने विधेयक मंजूर करून कायदा करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, खा. सुप्रिया सुळे यांनी याला विरोध करून सर्वसमावेशक समिती व मते घेऊन विधेयक मंजूर करावे अशी मागणी केल्यानंतर समिती स्थापन झाली. लाडकी बहीण योजनेच्या खर्चासंदर्भात ते म्हणाले, कोणतेही सरकार धोरणात्मक निर्णय घेताना त्या योजनेवरील खर्चाचा भार राज्याच्या तिजोरीवर पडतो. मात्र, आताचे सरकार हा खर्च स्वतःच्या खिशातून देत असल्याचे भासवत आहे.
सप्टेंबरअखेर आघाडीचे जागा वाटप होणार
येत्या काही दिवसांतच म्हणजे सप्टेंबरच्या ३० व ऑक्टोबरच्या १ तारखेला महाविकास आघाडीच्या प्रमुख घटक पक्षातील समितीच्या प्रमुखांची बैठक होणार आहे. या बैठकीत मतदारसंघाची पहिल्यांदा वाटणी होईल. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात कोणी लढायचे याबाबत चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. कोकणातील विधानसभा मतदारसंघात जो पक्ष आम्हाला ज्या ठिकाणी जागा सोडेल तेथून आम्ही लढणार आहोत, अशी भूमिका स्पष्ट करताना अद्याप कोणी कोठून लढायचे याचा निर्णय झाला नसल्याचे सांगून ‘बाजारात तुरी अन् कोण कोणाला मारी’ अशी विनोदी शैलीत त्यांनी जागा वाटपाबाबत आपले मत व्यक्त केले.
काका-पुतणे घरात एकत्रच…
या पत्रकार परिषदेत काका-पुतणे एकत्र येणार का? असा सवाल पत्रकारांनी खा. शरद पवार यांना विचारला. यावेळी ते मिश्कीलपणे म्हणाले, काका-पुतणे घरात एकत्रच आहेत आणि त्यावर अधिक बोलणे टाळले. राष्ट्रवादी पक्षाच्या न्यायालयीन लढ्याबाबत आपण न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत. त्यांनी येथे सभा घेतली, तो त्यांचा अधिकार आहे. त्यावर आपण भाष्य करणार नाही. त्यांनी कोणता उमेदवार द्यायचा हा देखील त्यांचा प्रश्न आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 24/Sep/2024