रत्नागिरी : दिवा ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेसचे इंजिन निवसर ते आडवली दरम्यान बिघडल्याने बुधवारी सायंकाळी मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या जनशताब्दी तसेच तेजस एक्स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्यांना फटका बसला. यापैकी जनशताब्दी एक्सप्रेस तीन तासापेक्षा अधिक तर तेजस एक्सप्रेस दोन तास विलंबाने धावत होती.
एकूण पाच गाड्यांचे वेळापत्रक या घटनेमुळे बिघडले. या संदर्भात उपलब्ध माहितीनुसार, दिवा ते सावंतवाडी दरम्यान धावणारी एक्स्प्रेस गाडी (१०१०५) ही बुधवारी आधीच जवळपास तीन तास उशिराने धावत होती. मडगाव ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस बुधवारी सायंकाळच्या सुमारास आडवली स्थानकानजीक आली असता त्याचवेळी दिव्यावरून सावंतवाडीला जाण्यासाठी आलेल्या एक्स्प्रेसचे इंजिन बिघडल्याने जनशताब्दी एक्स्प्रेसचा खोळंबा झाला. अडकून पडलेल्या दिवा सावंतवाडी एक्सप्रेसला मार्गातून बाजूला करण्याच्या कामात जनशताब्दी एक्सप्रेस तब्बल तीन तास रखडली.
दिवा ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेसचे इंजिन बिघडल्यामुळे आधीच विलंबाने धावत असलेली गाडी सावंतवाडीच्या दिशेने पाच तास ३९ मिनिटे इतकी उशिराने धावत होती. इंजिन बिघडलेल्या या गाडीशिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस वरून त्रिवेंद्रमच्या दिशेने धावणारी १६३४५ ही नेत्रावती एक्सप्रेस एक तास ५८ मिनिटे म्हणजे जवळपास दोन तास उशिराने धावत होती.
पनवेल ते सावंतवाडी दरम्यान धावणारी विशेष गाडी (०११७७) या घटनेमुळे सहा तास उशिराने धावत होती. तसेच मडगाव ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान धावणारी २२१२० ही तेजस एक्स्प्रेस देखील एक तास ५३ मिनिटे म्हणजे जवळपास दोन तास विलंबाने धावत होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 02/Nov/2024














