रत्नागिरी : खालगाव-जाकादेवी-तरवळ परिसराला वादळी पावसाने झोडपले

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी तरवळ परिसरात गुरुवार, दि. ३१ रोजी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या घरांचे व गोठ्यांवरील पत्रे उडाले. काही भागात विजेचे खांब कोलमडून पडल्याच्या घटना घडल्या.

गुरुवार, दि. ३१ रोजी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने आणि विजांच्या काडकडाटासह आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सायंकाळच्या दरम्यान खालगाव धामणेवाडी, खालगाव मधली गोताडवाड़ी, शेवटची गोतडवाडी, तरवळ मायंगडेवाडी तसेच माचीवलेवाडी परिसरामध्ये विजेचे सुमारे ९ ते १० खांब आणि मुख्य डी. पी. कोलमडून पडल्याने परिसरातील वीज प्रवाह खंडित झाला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात अंधार पसरला आहे.

अनेक ठिकाणी घरांवरील तसेच मोठ्यांवरील कौले व पत्रे उडण्याचे प्रकार घडले आहेत खालगाव जाकादेवी वस्तीत विजेचे खांब कोलमडून पडले. या अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी भात कापून शेतात सुकायला ठेवले होते. ते भिजून नुकसान झाले आहे.

ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान
ऐन सणासुदीच्या काळात आलेल्या अस्मानी संकटामुळे परिसरातील सर्व नागरिक भयभीत झाले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही परंतु येथील ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा सुरळीत सुरू होण्यासाठी महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्माचारी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 02/Nov/2024