रत्नागिरी : नाराज उदय बने यांची मनधरणी करण्यासाठी अखेर उबाठाचे उमेदवार बाळ माने यांनी निवास्थानी भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे. आपल्याला या निवडणुकीत सहकार्य करावे, अशी विनंती बाळ माने यांनी केली. परंतु, बने यांनी ही विनंती धुडकावली. आज दिवाळीचा सण आहे, माझ्या घरी आलात फराळ करा. मात्र, मला राजकारणावर काहीच बोलायचे नाही, अजून माझी भूमिका ठरलेली नाही, असे बने यांनी स्पष्ट केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे बनेंची भूमिका अजून गुलदस्त्यातच आहे.
उदय बने हे शिवसेनेचे निष्ठावंत म्हणूनच ४५ वर्षे काम करत आहेत. त्यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आणि पक्षासाठीही त्यागही केल्याची अनेक उदाहरणे आहेत; परंतु त्यांनी पक्षावर कधीच जाहीर नाराजी व्यक्त केली नव्हती. फुटीनंतरची उबाठा शिवसेनेची पहिलीच निवडणूक आहेत. अनेक दिग्गज शिंदे शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे उदय सामंत यांना टक्कर देणारा तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात उबाठा होती. उदय बने या निष्ठावंताचे नाव इच्छुकांमध्ये पुढे होते. अगदी बने यांची उमेदवारी निश्चित झाली आणि त्यांना मुंबईला बोलावणेही झाले. या दरम्यान भाजपमध्ये नाराज असलेले बाळ माने शिवसेनेत येण्यासाठी फिल्डिंग लावून होते. त्यांची मातोश्रीशी चर्चाही झाली होती. आयत्यावेळी उदय बनेंना डावलून पक्षाने बाळ माने यांचा पक्षात प्रवेश करून त्यांना उमेदवारी दिली. उबाठाच्या एकाही नेत्याने बने यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. हे सर्व जिव्हारी लागल्याने त्यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 02/Nov/2024














