रत्नागिरी : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांचा एकही उमेदवार नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांत काँग्रेस आणि भाजपा या राष्ट्रीय पक्षांचा एकही अधिकृत उमेदवार नाही. युती, आघाडीतील राज्यस्तरावरावरच्या पक्षांच्या उमेदवारांना या राष्ट्रीय पक्षांचा टेकू आहे. राजापूर आणि रत्नागिरी मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले. मात्र, हे उमेदवारी अर्ज भरण्यास जाताना उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्या गळ्यात काँग्रेसच्या हाताच्या पंजाच्या निशाणीचे गमछे होते. त्याचबरोबर हातात काँग्रेसच्या निशाणीचे झेंडेसुद्धा होते.

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना सुमारे दीड वर्षांपूर्वी या पक्षाची राष्ट्रीय मान्यता निवडणूक आयोगाने रद्द ठरवली. त्याचबरोबर आता राष्ट्रवादीचे दोन गट झाले आहेत.

राष्ट्रवादीचे हे दोन्ही गट आणि शिवसेनेचे दोन्ही गट प्रदेश पातळीवरचे राजकीय पक्ष ठरले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उमेदवारांमध्ये जोरदार चुरस आहे. या निवडणुकीतील दुसरे वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी राजापूर विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी मतदार संघातून काँग्रेसच्या कैस फणसोपकर यांनीसुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज भरताना काढलेल्या मिरवणुकीतील नेते, कार्यकर्त्यांच्या गळ्यात काँग्रेसच्या हाताच्या निशाणीचे गमछे होते त्याचबरोबर हातात काँग्रेसच्याच निशाणीचे झेंडे दिसून आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 02/Nov/2024