गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर वाडजई येथील साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टने रस्त्याच्या बाजूला वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून लावलेली सुमारे दीडशे रोपे महावितरणची अंडरग्राऊंड केबल टाकताना ठेकेदाराने चर खणत असताना उपटून टाकली आहेत. यामुळे ठेकेदाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.
जमीन मालकांची कोणतीही परवानगी न घेता जेसीबीने चर खणत असताना ही रोपे उपटून फेकून दिली. याबाबत साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी शरद जोशी यांनी सांगितले की, आमच्या ट्रस्टतर्फे पर्यावरण रक्षणासाठी व पादचाऱ्यांना सावली मिळावी म्हणून आम्ही वेळणेश्वर येथे जुलै २०२३ मध्ये शंभर वडाची झाडे वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून लावली होती. त्यातली काही झाडे पावसाने कुजल्या मुळे मेल्यानंतर जुलै २०२४ ला आम्ही दीडशे रुपयाला एक अशी सात फूट उंचीची साठ झाडे देवरुख येथील जंगल नर्सरीतून आणून पुन्हा लावली. या प्रकल्पासाठी तीन लाख रुपये खर्च केले.
केबल टाकायच्या कामासाठी जेसीबीने चर खणत असताना, पर्यावरणासाठी अतिशय मौल्यवान असलेली झाडे निर्दयीपणे उपटून फेकून दिली. आम्ही डोनेशन मिळवून स्वखर्चाने हा उपक्रम राबवून ती झाडे लावली. त्याला पाणी घालून ती जगवली आणि ही रोपे ठेकेदाराने उपटून टाकली आहेत. याला सर्वस्वी महावितरण कंपनी जबाबदार आहे.
ठेकेदाराने झाडे पुन्हा लावावीत
या ठेकेदाराकडून नुकसान भरपाई वसूल करत सव्वाशे ते दीडशे झाड पुन्हा लावावीत. याबाबत ग्रामपंचायत, पर्यावरण मंत्रालय येथे पत्र व्यवहार करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 02/Nov/2024














