‘लाडक्या बहिणीं’ना डिसेंबर महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती..

मुंबई : राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी सरकारने ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबरचे पैसे दिले आहेत. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत. दरम्यान, आता डिसेंबर महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार? हे राज्यभरातून विचारले जात होते. यावर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.

डिसेंबर महिन्याचे पैसे नेमके कधी येणार?

एकनाथ शिंदे आज (2 नोव्हेंबर) एका वृत्तसंस्थेशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं आहे. आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना दिले जाणारे पैसे लांबणीवर पडू नयेत म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच दिले आहेत. राज्यात विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालानंतर आम्ही महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यातच देणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शिंदेंनी केली विरोधकांवर टीका

मी शेतकरी कुटुंबातून येतो. मला गरिबी माहिती आहे. जेव्हा कधी मी सत्तेत जाईन तेव्हा मी माझ्या गरीब बहीण, आई, शेतकरी, भाऊ यांच्यासाठी काहीतरी करेन, असा नेहमी विचार करायचो. याबात मी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यानंतर आम्ही राज्यात अनेक योजना लागू केल्या. विरोधकांना या गोष्टी पचत नाहीयेत. या निवडणुकीत ते पराभूत होणार आहेत. म्हणूनच त्यांच्याकडून या योजनांवर टीका केली जात आहे, असे शिंदे म्हणाले.

जून महिन्यात योजनाला सरकारकडून मान्यता

दरम्यान, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी सरकारने ही योजना चालू केली. 28 जून 2024 रोजी या योजनेस मान्यता देण्यात आली होती. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये DBT द्वारे देण्यात येत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:49 02-11-2024