खेड : विधानसभा निवडणुकीसह दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी अवैध धंद्यांवरील कारवाईची मोहीम गतिमान केली आहे. गावठी हातभट्टीच्या दारूसह मटका, जुगार अड्डे, गुटखा व गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई जोमात सुरू आहे. मटका व जुगार अड्डयांवर पोलिसांचे धाडसत्र सुरू असले तरी तेवढ्यापुरते अड्डे बंद ठेवून पुन्हा छुप्या पद्धतीने मटके, जुगार अड्डे सुरूच असल्याची बाब समोर आली आहे.
पोलीस निरीक्षक भोयर यांनी गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यांसह मटका जुगार अड्यांवर कारवाईची घेतलेली मोहीम अजूनही सुरूच आहे. शहरासह ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्ट्यांवर धाडी टाकून रसायन ताब्यात घेण्यासह विक्री करणाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात येत असल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अवैध धंद्यांवरील कारवाईची मोहीम पोलीस निरीक्षक भोयर यांनी गतिमान केल्याने व्यावसायिक हतबल झाले आहेत.
शहरात मटका जुगार अड्डे चालवणारे व्यावसायिक मात्र पोलिसांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे निदर्शनास येत आहे. तेवढ्यापुरते अड्डे बंद ठेवून त्यानंतर मटके, जुगार अड्डे छुप्या पद्धतीने तेजीत सुरू असल्याची बाब समोर आली आहे. छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अशा मटका जुगार अड्डयांवर धडक कारवाई करून ते बंद करण्यासाठी पोलीस नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:53 PM 02/Nov/2024














