रत्नागिरीत आजपासून ‘कथक विधा’ कथक नृत्य कार्यशाळा

रत्नागिरी : नूपुर कथक अकादमीच्या संचालिका वैशाली वैशंपायन पोतदार यांची ‘कथक विधा’ कथक कार्यशाळा रत्नागिरीत आयोजित केली आहे. ही कार्यशाळा ४ ते ९ नोव्हेंबर दरम्यान जयस्तंभ येथील महिला मंडळ सभागृहात होणार आहे.

वैशाली वैशंपायन या रत्नागिरीची माहेरवाशीण आहेत. त्यांचे शालेय शिक्षण रत्नागिरीत झाले. तसेच कथकच शिक्षणही गुरछ बाळासाहेब हिरेमठ यांच्याकडे झाले. त्या म्हणाल्या की, नृत्यातील पुढील शिक्षण घेण्यासाठी मला पुण्याला जावे लागले. आज मागे वळून पाहताना वाटते की इथेच मला शिक्षण मिळाले असते तर मला बाहेर जावे लागले नसते. नृत्यात एम ए ची पदवी मिळवून तसेच नृत्यालंकार होऊन कथक नृत्य गुरू म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी काही वर्षे द्यावी लागली आणि आज स्वबळावर स्वतःची नृत्य संरचना असलेला शिवकल्याण राजा हा कार्यक्रम महाराष्ट्रात १२ ठिकाणी केला. तेव्हा कथ्थकचा वेगळा प्रवास अनुभवला आणि या साऱ्या जमलेल्या अनुभवातून ही कार्यशाळेची संकल्पना मनात रुंजी घालू लागली.

आपल्या भारतीय शास्त्रीय अभिजात नृत्यशैलीची नव्या मुलींना ओळख व्हावी, त्यात रुची वाटावी, ज्या मुली शिकत आहेत त्यांना यातून कथ्थकचा आवाका कळावा, नवी दिशा मिळावी या हेतूने पहिली कार्यशाळा विलेपार्ले (मुंबई) येथे घेतली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीत मला अवगत झालेली ही शैली पोहोचवावी अशी मनापासून इच्छा आहे.

ज्यांनी नृत्याचे शिक्षण घेतले नाही पण नृत्याची आवड आहे त्यांना कार्यशाळेत कथकची तोंड ओळख होईल आणि त्यातून ही नृत्यकला शिकावीशी वाटेल अशांसाठी BEGINNER BATCH (फी रुपये 1200, वेळ : स. 10.30 ते 12.30) असेल. ज्या मुली शिकत आहेत नृत्याच्या काही परीक्षा दिल्या आहेत त्यांना त्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल त्यांच्यासाठी INTERMEDIATE BATCH (Fee रुपये 1500, वेळ दु. 1.30 ते 3.30). ज्यांचे नृत्य शिक्षण पूर्ण होत आले आहे त्यांना कथकची सौंदर्यस्थळे अधिक सखोल जाणून घेता येतील अशांसाठी ADVANCE BATCH (फी रुपये 2000, वेळ दु 4.30 ते 6.30). कार्यशाळेमध्ये घेतलेल्या शिक्षणातून नृत्य सादरीकरणाचा एक छोटासा कार्यक्रम ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल.

भारतीय अभिजात शास्त्रीय नृत्यशैलीची ओळख व्हावी, त्याची गोडी लागावी आणि त्यामागे परंपरेने चालत आलेल्या साधनेचे महत्त्व आजच्या पिढीपर्यंत पोहोचावे, हा कार्यशाळा करण्यामागचा उद्देश आहे. तेव्हा सर्वांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैशाली पोतदार यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 04/Nov/2024