खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील विद्युतीकरणाच्या कामासह अंतर्गत कामे पूर्ण करण्याचे काम हाती घेण्यात आल्याने २० सप्टेंबरपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. दीपावलीनंतर बोगद्यातील वाहतूक खुली करण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र बोगद्यानजकीच्या पुलाचे काम हाती घेण्यात आल्याने १५ डिसेंबरनंतरच कशेडीचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कशेडीचा दुसरा बोगदा ५ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी खुला झाला होता. मात्र बोगद्यात तात्पुरत्या स्वरूपातीलच वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात आल्याने गणेशोत्सव संपताच विद्युतीकरणाच्या कामासाठी वाहतुकीला ब्रेक लागला होता.
कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील विद्युतीकरणासह अंतर्गत कामांसाठी ५०हून अधिक कामगारांची फौज दिवस-रात्र राबत आहे. सद्यस्थितीत विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी बोगद्यानजीक पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. याठिकाणी गर्डर बसवण्याच्या कामासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे डिसेंबरनंतरच कशेडीचा दुसरा वाहतुकीसाठी खुला होईल, असे राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 04/Nov/2024














