खेड : खेडमध्ये कारमधून गांजाच्या विक्रीसाठी आलेल्या दोघांना खेड पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून ९ हजार रुपये किमतीचा ४५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री २:०० वाजण्याच्या दरम्यान खेड शहरातील देवणा पूल येथे करण्यात आली.
मुस्तकिम जहांगिर कादिरी (२९), आतिक राऊफ कादिरी (३०, दोघे रा. नांदगाव मोहल्लाजवळ, खेड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलिस शिपाई प्रकाश पवार यांनी फिर्याद दिली आहे. खेडमधील देवणा पूल येथे मुस्तकिम कादिरी आणि आतिक कादिरी हे दोघे कार (एमएच ०५, सीए २४३६) मधून गांजा घेऊन खास ग्राहकांना विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस पथक रवाना करण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी या भागात सापळा रचला होता. हे दोघे गुरुवारी मध्यरात्री २:०० वाजण्याच्या सुमाराला पुलाजवळ उभे असता पोलिसांनी त्यांना पकडले.
या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ९ हजार रुपयांचा ४५० ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा सापडला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून, त्यांच्याकडील चारचाकी, दोन मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण ३० लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी मुस्तकिम कादिरी व आतिक कादिरी यांच्यावर अमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ कायदा कलम ८ (क), २० (ब), (२), २२ (अ) भारतीय न्याय संहिता कलम ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:04 PM 04/Nov/2024














