चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात सहा उमेदवार रिंगणात

चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून सहा उमेदवार रिंगणात उत्तरले आहेत. एकूण १२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी चार अर्ज अवैध ठरले. त्यानंतर आठ उमेदवारापैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता चिपळूण-संगमेश्वरमध्ये सहा उमदेवारांमध्ये लढत होणार असून, मुख्य लढत आ. शेखर निकम विरुद्ध प्रशांत यादव यांच्यात होणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नसिरा अब्दुल रेहमान काझी व सुनील शांताराम खंडागळे या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात आ. शेखर गोविंदराव निकम, प्रशांत बबन यादव, अपक्ष उमेदवार अनघा राजेश कांगणे, प्रशांत भगवान यादव, महेंद्र जयराम पवार, शेखर गंगाराम निकम हे उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

या संदर्भात माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे म्हणाले, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात ३३३ मतदान केंद्र असून एकूण मतदार २ लाख ७६ हजार ६६ आहेत. यामध्ये पुरुष १ लाख ३४ हजार ८८३ तर स्त्रिया १ लाख ४१ हजार १८३ मतदार आहेत. मतदारसंघात ८४७ होम व्होटर आहेत. त्यांच्यासाठी १४ ते १७ या कालावधीत मतदान प्रक्रिया केली जाणार आहे. यावेळी तहसीलदार प्रवीण लोकरे उपस्थित होते.

चिपळुणात डबल नेमचा गेम…
चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात डबल नेमचा गेम खेळण्यात आला आहे. यामध्ये दोन अपक्ष उमेदवार डुप्लीकेट नावाचे आहेत. यामध्ये प्रशांत भगवान यादव व शेखर गंगाराम निकम हे दोन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या दोघांनीही ट्रम्पेट निशाणीची मागणी केली होती. एकच चिन्ह दोघांना देता येणार नाही म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी चिठ्ठी टाकून निशाणी दिली. ही निशाणी प्रशांत भगवान यादव यांना मिळाली आहे तर शेखर गंगाराम निकम यांना कोबी फूल ही निशाणी मिळाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 05/Nov/2024