रत्नागिरी : शिवसैनिक म्हणून ४५ वर्षे आपण पक्षात कार्यरत होतो. उमेदवारीसाठी कधीच इच्छुक नव्हतो, मात्र संपूर्ण तालुका कार्यकारीणीने शिफारस केल्यामुळेच आपण रिंगणात उतरलो होतो. पक्षप्रमुखांच्या हिशेबात आपल्यात क्षमता कमी दिसली असेल म्हणून उमेदवारी दिली नसेल. त्यामुळे यापुढे शिवसेना हा विषय थांबवला असून, सामाजिक सेवा सुरु ठेवणार असल्याची स्पष्ट भूमिका उदय बने यांनी व्यक्त केली. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांनी कुणालाही पाठिंबा देण्याबाबतची घोषणा केली नाही.
उबाठाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता; परंतु सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की शिवसेना उबाठाच्या सर्व तालुका कार्यकारिणीचे मी आभार मानतो की त्यांनी उमेदवार म्हणून माझी शिफारस केली. त्यामुळे मी तयार झालो होतो.
आता मी शिवसेना हा विषय थांबवला असून, यापुढे फक्त समाजसेवा करायची आहे. यापूर्वी जी लोकांची कामे मी करीत आलो आहे तीच कामे यापुढेही चालू ठेवणार आहे. मी शिवसेना उबाठाचा साधा बुथप्रमुखही नाही आहे. फक्त साधा सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझे काम सुरु राहणार असून, कुणालाही पाठिंबा देण्याऐवढा आपण मोठा नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उबाठा शिवसेनेच्या रत्नागिरी तालुका कार्यकारिणीचे विशेष आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 05/Nov/2024














