रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ आज धडाडणार..

त्नागिरी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी, ५ नोव्हेंबरपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. रत्नागिरीतून ते आपल्या प्रचारसभेला सुरुवात करतील.

सायंकाळी ६ वाजता साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळ उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना संबोधित करणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी लोकसभेला कोकणातील दोन्ही मतदार संघांतून महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. दि. १७ नोव्हेंबर रोजी मुंबईत त्यांची सांगता सभा होणार आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून उबाठाने माजी आमदार बाळ माने यांना उमेदवारी दिली आहे. ना. उदय सामंत यांच्यामसमोर भाजपमधून तीनवेळा लढणारे बाळ माने या वेळी प्रथमच उबाठा शिवसेनतून ना. उदय सामंत यांच्या समोर लढत आहेत, तर ना. सामंत हेही शिवसेनेतून रिंगणात उभे राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरेंचा निशाणा कोणावर?

उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी उबाठामार्फत सुरू असून, सभेला विक्रमी गर्दी करण्याची तयारी करण्यात आली आहे. या सभेला उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. या सभेत ठाकरे कोणावर निशाणा साधतात,.. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 05-11-2024