चिपळूण : नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या वतीने ५ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे रंगभूमी दिन साजरा करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ महिला रंगकर्मीचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी दिली. गेली काही वर्षे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र बंद असले, तरी चिपळूणमधील रंगकर्मी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र समोरील पारावर रंगभूमी दिन साजरा करीत आले आहेत. गतवर्षी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सुरू झाले आणि या ठिकाणी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. यंदाही रंगभूमी दिन साजरा करण्यात येणार असून, गेल्यावर्षीप्रमाणे रंगमंचावर जाऊन रंगभूमीचे पूजन केले जाईल. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी रेखा कोळथरकर, रंजना वाडकर, शोभा वाडकर यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. ज्या काळात महिलांनी रंगमंचावर काम करणे, याला मान्यता नव्हती, त्याच काळात या महिला कलाकारांनी विविध नाटकातून भूमिका केल्या आणि महिलांसाठी रंगमंचावर येण्याचा मार्ग खुला करून दिला. या तिन्ही ज्येष्ठ महिला रंगकर्मीचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार असून, योगेश बांडागळे हे त्यांची मुलाखत घेणार आहेत. या कार्यक्रमाला चिपळूण शहर व परिसरातील रंगकर्मीनी नाट्य परिषदेच्या सर्व सदस्यांना, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेच्या वतीने डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 05-11-2024














