दापोलीत एका उमेदवाराची माघार; नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात

दापोली : सुनील पांडुरंग खाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दापोली विधानसभा मतदारसंघात ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संतोष अवगु, शिवसेनेकडून योगेश रामदास कदम, उबाठाकडून संजय वसंत कदम, बहुजन समाज पार्टी कडून प्रवीण सहदेव मर्चेंडे, अपक्ष म्हणून योगेश रामदास कदम, योगेश विठ्ठल कदम, संजय सीताराम कदम, संजय संभाजी कदम व ज्ञानदेव रामचंद्र खांबे यांचा समावेश आहे. या निवडणुकीमध्ये तीन योगेश कदम व तीन संजय कदम यांनी निवडणूक अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी सांगितले की, या मतदार संघात ४७० ईव्हीएम मशीन आणि ५७ राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या, तीन मिनीबसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निवडणुकीमध्ये गृह मतदारांची संख्या ९३० आहे. याकरिता ४२ पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदान केंद्रात एकच मशीन असणार असून १४ दिवस उमेदवारांना प्रचाराकरिता मिळणार आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रचाराची मुभा देण्यात आलेली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. ही मतमोजणी प्रक्रिया डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या या सभागृहात पार पडणार आहे. याकरिता डॉ. सुमित जरंगण यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

२ लाख ९१ हजार २९७ मतदार बजावणार हक्क
या निवडणुकीमध्ये ५६९७ नव मतदार आपला निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत. तसेच १ लाख ३९ हजार ८९५ पुरुष व १ लाख ५१, ४०२ स्त्रिया मिळून २ लाख ९१ हजार २९७ मतदार आपला निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ८५ वर्षावरील मतदारांची संख्या ३५६० असून, १६०९ दिव्यांग मतदार देखील मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 05/Nov/2024