देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे आजपासून निवासी शिबिर

देवरूख : शहरातील आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (२ स्तर) विभागातर्फे कबनूरकर हॉल, साखरपा या ठिकाणी ७ दिवसांचे श्रमसंस्कार निवासी शिबीर ५ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

या श्रमसंस्कार शिबिरामध्ये ग्रामस्वच्छता, वनराई बंधारे बांधणे, वृक्ष संवर्धन, रस्त्यांची दुरुस्ती, प्लास्टिक वापरावर निर्बंध, सार्वजनिक वास्तू व परिसर यांची स्वच्छता अशा कामांसह विविध क्षेत्रीय भेटीतून शिबिरार्थीवर श्रममूल्य संस्कार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

जनजागृती फेरी, ग्रामसर्वेक्षण, महिला सवलीकरण यासारख्या उपक्रमांमधून ग्रामीण जीवनाचा परिचय करून देऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव केली जाणार आहे. तसेच शिबिरार्थीसाठी बौद्धिक व उद्बोधनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

या निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन प्रियांका जोयशी, सरपंच, ग्रामपंचायत कोंडगाव साखरपा यांच्या हस्ते तर समारंभाचे अध्यक्षस्थान दे. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत भूषवणार असून, याप्रसंगी संस्था उपाध्यक्षा नेहा जोशी, श्रीधर कबनूरकर (अध्यक्ष, व्यापारी संघटना, कोंडगाव साखरपा), कनिष्ठ महाविद्यालय शाळा समिती अध्यक्षा अॅड. वेदा प्रभुदेसाई उपस्थित राहणार आहेत. या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप ११ नोव्हेंबर, २०२४ रोजी होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले भूषवणार आहेत.

या शिबिराला महेश चोथे (शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग), स्मिता गौड (सहाय्यक शिक्षण उपसंचालिका, कोल्हापूर), हणमंत बिराजदार (सहाय्यक शिक्षण, उपनिरीक्षक), राजेंद्र कोळेकर (विभागीय समन्वयक, कोल्हापूर विभाग), लक्ष्मीकांत पाटील (जिल्हा समन्वयक, रा. से. योजना २ स्तर, रत्नागिरी) आदी भेट देणार असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 05/Nov/2024