माखजन : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात व बाजूच्या गावात माकडांचा व रानडुक्करांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आंबव पोंक्षे गाव हा चार डोंगरांच्यामध्ये असल्याने वन्य प्राण्यांचा त्रास वाढत चालला आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
रानडुकरांकडून शेतमालाची नासधूस होत आहे. शिवाय माकडांकडून केळी, पावटा, कडवा, तूर, चवळी आदी पिकांचे नुकसान होत आहे. आंबा हंगामात माकडांकडून मोठे नुकसान होत आहे. पारंपरिक केल्या जाणाऱ्या शिकारी कमी झाल्याने रानडुकरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे बोलले जात आहे. रानडुकरांचा व माकडांचा कायमचा बंदोबस्त करावा. माकडांना, शासनाकडून पकडण्यासाठी यंत्रणा राबवावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
रानडुकरांकडून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण येथील शेतकरी निमूटपणे नुकसान सहन करत आहेत. अनेकांनी भातशेती न करण्याचा निर्णय घेतला आहे. या गावात बिबट्याचा देखील मुक्त संचार आहे. बिबट्याची दहशत देखील या गावात आहेच. गेल्या २-३ वर्षांत या गावात सुमारे २५ बकऱ्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान लक्षात घेता, या वन्यप्राण्यांना पकडून अभयारण्यात सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहेत.
यावर्षी वन्यजीवांकडून होणारा त्रास रोखावा
ज्याप्रमाणे वन्यप्राण्यांना मारण्यासाठी कडक कायदे आहेत, शिवाय शासनाकडून प्रतिबंध केला जातो, त्याचप्रमाणे या वन्यप्राण्यांपासून मानवी वस्तीला व पिकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे, ही जबाबदारी म्हणून पार पडायला हवी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 05/Nov/2024














