न्यूझीलंडने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा तिसऱ्या कसोटीत २५ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांची मालिका ३-०ने जिंकली. मायदेशात टीम इंडियावर (Team India) पहिलाच व्हाईटवॉश मिळण्याची नामुष्की पहिल्यांदाच ओढवली.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने IND vs NZ मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात निराशाजनक कामगिरी केली होतीच. तिसरा सामना मुंबईत असल्याने ‘मुंबईचा राजा’ रोहित शर्माकडून साऱ्यांनाच खूप अपेक्षा होत्या. पण रोहितसह सर्वच खेळाडूंनी चाहत्यांची निराशा केली. रिषभ पंत (Rishabh Pant) वगळता एकाही खेळाडूला फलंदाजीत चमक दाखवता आली नाही. रोहित संपूर्ण मालिकेत ३ कसोटीतील ६ डावांत मिळून एकूण फक्त ९१ धावा केल्या. त्याच्या या निराशाजनक कामगिरीनंतर आता, आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील (Australia Tour) पहिल्या दोन सामन्यांसाठी रोहित उपलब्ध नसल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत रोहितबाबत BCCI ने कठोर निर्णय घ्यायला हवेत, असे रोखठोक मत लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
“अशी माहिती मिळत आहे की रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटीला मुकणार आहे. काही वृत्तानुसार तो दुसरी कसोटीही खेळू शकणार नाहीये. जर हे खरं असेल तर मला वाटतं की भारतीय सिलेक्टर्सने त्याला स्पष्टपणे सांगायला हवं की तुला विश्रांती घ्यायची असेल तर तू जरूर आराम कर. तुझी कारणे वैयक्तिक असतील तर तू त्याकडे लक्ष दे. पण जर तू जर संपूर्ण मालिकेतील दोन तृतीयांश मालिकेत उपलब्ध नसशील तर तू मालिकेतील उर्वरित सामने फक्त एक खेळाडू म्हणून खेळ. आम्ही सध्याचा उपकर्णधार असलेल्या जसप्रीत बुमराहला या दौऱ्यावर कर्णधार करतो,” असे अत्यंत सडेतोड मत सुनील गावसकर यांनी मांडले.
“भारतीय क्रिकेट हा सध्या चर्चेचा विषय होत चालला आहे. आपण जर न्यूझीलंड विरूद्धची मालिका ३-० ने जिंकलो असतो तर परिस्थिती वेगळी असती. पण आपण ३-० ने मालिका गमावली आहे. अशा वेळी भारताला कर्णधाराची पूर्ण वेळ गरज असणार आहे. मनोबल खचलेल्या संघाला एकत्रित करण्याची जबाबदारी कर्णधारावर असते. त्यामुळे दौऱ्याच्या सुरुवातीला कर्णधारच नसेल तर अशा वेळी दुसऱ्या कुणालातरी कर्णधार करणे हेच योग्य आहे,” असेही गावसकर म्हणाले.
दरम्यान, आतापर्यंत जसप्रीत बुमराहने एका कसोटीत भारताचे नेतृत्व केले आहे. हा सामना इंग्लंड विरूद्ध बर्मिंगहॅम येथे २०२२ मध्ये खेळला गेला होता. या सामन्यात इंग्लंडने शेवटच्या डावात ३७८ धावांचे आव्हान पार करून सामना ७ गडी राखून जिंकला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 05-11-2024