चिपळुणात २७ हेक्टर भातशेतीचे नुकसान

चिपळूण : यंदा परतीच्या पावसाने कहर केल्यामुळे खरीप हंगामाला फटका बसला आहे. चिपळूण तालुक्यातील दोनशे शेतकऱ्यांचे सुमारे २७ हेक्टर क्षेत्रांवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. ऐन काढणीच्या कालावधीत हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला गेला. यंदा चांगला पाऊस होऊनही अपेक्षित उत्पादन हाती आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी निरुत्साही गेली. दिवाळी आली काय आणि गेली काय…, अशी प्रतिक्रिया बळीराजा व्यक्त करत आहे.

सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना चिपळूण तालुक्याला पावसाने झोडपून काढले. पोफळी, शिरगाव परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज पडल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळाली. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात अंधार पसरलेला होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत अनेकांच्या घरात वीज नव्हती. दिवाळी म्हटले की, घरांना रंगरंगोटी केली जाते. यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी शेतातच गेली.

वीर, देवपाठमध्ये मोठे नुकसान
वीर गावातील ३१ शेतकऱ्यांचे ७.५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. देवपाठमधील २३ शेतकऱ्यांचे ४.६० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल मुंढे, तळसर, शिरगाव, वेहळे, अनारी, कापसाळ या गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झाले आहेत. तालुक्यात ६५ टक्के भातशेती कापण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नसतील त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी सहायकांशी संपर्क साधावा. –शत्रुघ्न म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 05/Nov/2024