कुणबी समाजोन्नती संघ राजापूरतर्फे कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही

राजापूर : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा राजापूरची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी संघाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही, असे स्पष्ट करत संघाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजातील नागरिकांनी आपापल्या पक्षाचे काम करावे. मात्र हे काम करीत असताना संघटनेत निवडणूक दरम्यान राजकीय वाद-विवाद न करता एकोपा आणि सलोखा कायम राखण्यासाठी राजकीय पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांनी व समाजबांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामिण शाखा राजापूरची बैठक ज्येष्ठ पदाधिकारी रवींद्र नागरेकर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील नगर वाचनालय सभागृहात पार पडली. विधानसभेच्या पाठिंबा संदर्भात चर्चा करण्यात आली. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर कुणबी समाजोन्नती संघाने या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे का, अशी संघाच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा करण्यात येत आहे. संघाच्या शाखेतील व ग्रामीण समितीमधील कार्यकर्ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये काम करीत आहेत, त्यांनी तसेच काम करीत रहावे, अशी संघाची राजकीय विचारधारा असली तरी परिस्थितीनुसार समाजाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करून भूमिकेत बदल केला जातो. मात्र यावेळी संघाने पाठिंबा देण्याबाबत असे कोणतेही आवाहन अद्याप शाखांना केलेले नाही. या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली असून संघाच्या भूमिकेशी पदाधिकारी सहमत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी प्रकाश कातकर, संदीप तेरवणकर, पांडुरंग लिगम, दीपक बेंद्रे, रमेश पाजवे, सुरेश बाईत, सुरेंद्र तांबे, देविदास राघव, तुकाराम कुडकर, संतोष हातणकर, गोपाळ गोंडाळ, सुभाष नवाळे, मोहन पाडावे, भास्कर कुवळेकर, संजय नाटेकर, शांताराम तळवडेकर, सतीश बंडवे, वसंत आंबेलकर, प्रदीप हातणकर, संजय पेडणेकर, चिन्मय तिर्लोटकर, अक्षय कशेळकर यांसह अन्य उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:09 PM 05/Nov/2024