खेड : खेड तालुक्यातील देवघर-सोंडे ग्रामपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पर्यावरणपूरक दीपावली साजरी करण्यासाठी पुढाकार घेत दीपावलीत भेट म्हणून झाडांची रोपे द्या, असा स्तुत्य उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. प्लास्टिकच्या दिव्यांऐवजी मातीच्या दिव्यांचा वापर करण्याचे आवाहनही ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना केले आहे. ग्रामपंचायतीच्या या आवाहनाला ग्रामस्थांचाही सकारात्मक प्रतिसाद लाभत असल्याने अभियान यशस्वी होण्यास मदत होत आहे. देवघर-सोंडे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत आजवर विविधांगी उपक्रम राबवत जनजागृतीवर भर दिला आहे. प्रत्येक उपक्रमात ग्रामस्थांसह शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका निभावली.
या अभियानापाठोपाठ स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत ‘स्वच्छ दिवाळी शुभ दीपावली’ साजरी करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. या अभियानांतर्गत प्लास्टिक दिव्यांऐवजी मातीच्या दिव्यांचा वापर करण्याच्या आवाहनाला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद लाभला. नैसर्गिक रंग वापरण्याबाबत सूचना करत प्रचंड धूर किंवा ध्वनी उत्सर्जित करणाऱ्या फटाक्यांचा वापर न करण्याचे आवाहनही केले आहे. सजावटीसाठी प्लास्टिकच्या वस्तू न वापरता इको फ्रेंडली वस्तू निवडण्याचाही सल्ला देत दीपावलीसाठी भेट म्हणून झाडाची रोपे देण्याबाबत सूचित केले आहे. या आवाहनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे सरपंच सुनील मोरे, उपसरपंच नामदेव सोंडकर, ग्रामसेवक दीपक कदम यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 05/Nov/2024














