कोकणरत्न पुरस्काराने ओंकार भोजने सन्मानित

चिपळूण : कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात संस्थेच्या वतीने मराठी सिनेसृष्टीतील, तसेच टेलिव्हिजनवरील कलाकार ओंकार भोजने यांना यावर्षीच्या कोकण संस्थेच्या राज्यस्तरीय कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सहकाराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला महाराष्ट्र राज्यात मानाचे स्थान निर्माण करून देणारे, तसेच जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येकाला जिल्हा बँकेशी जोडून त्यांना सरकारच्या परिघात आणणारे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना सहकारातील कार्यासाठी कोकणरत्न, तर रेणू दांडेकर यांना समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मश्री राहीबाई पोपरे, हिरवळ ट्रस्टचे अध्यक्ष किशोर धारिया, लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका रेणू दांडेकर, दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर, सिंधुदुर्ग बँकेचे उपाध्यक्ष दिनकर तावडे आणि कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

युवा गायकांच्या सुरेल भावगीत मैफिलीने सुरू झालेल्या या कार्यक्रमात समाजाच्या विकासासाठी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना समाजगौरव पुरस्कार कंटेंट क्रिएटरसाठी रोल टू रियल पुरस्कार, ग्रामविकासातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आदर्श गाव पुरस्कार, ग्रामीण भागातील महिलांसाठी झिरो टू हिरो पुरस्कार, तसेच युवा उद्योजकांसाठी युवा आयकॉन पुरस्काराच्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन अक्षय ओवळे आणि संजना पाटील यांनी केले. संस्थेचे योगेश भोसले, कंटेंट क्रिएटर गौरी पवार, अजित दळवी, सुनील करंडे, गणेश नाईक कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:08 PM 05/Nov/2024