रत्नागिरी : चौथ्या महाराष्ट्र विधानसभेसाठी महाराष्ट्रामध्ये मार्च १९७२ मध्ये निवडणूक झाली. एकूण २७० जागांसाठी ही निवडणूक लढवली गेली. यामध्ये भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसला सर्वाधिक २२२ जागा मिळाल्या. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी ७ मतदार संघांवर काँग्रेसने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुकीत जिल्ह्यात प्रथमच जनसंघाने आपले खाते उघडले.
पीएसपीला मात्र एकही जागा मिळाली नाही. या निवडणुकीत राज्यात काँग्रेसला एकूण मतांच्या तब्बल ५६. ३६ टक्के मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे फक्त ७ आमदार निवडून आले. नुकत्याच स्थापन झालेल्या शिवसेनेचा देखील एका आमदाराने सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. निवडणुकीनंतर विद्यमान मुख्यमंत्री वसंतराव नाईक पुन्हा मुख्यमंत्री झाले.
पुढील पाच वर्षाच वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण व वसंतदादा पाटील असे तीन मुख्यमंत्री राज्याला पाहायला मिळाले. जिल्ह्यात ८ पैकी ७ जागांवर काँग्रेसने विजय मिळवत पुन्हा एकदा आपणच जिल्ह्यात नंबर १ आहोत हे दाखवून दिले. यावेळी मात्र पीएसपीला खातंही उघडता आलं नाही. दुसऱ्या बाजूला मात्र जनसंघाने आपलं खातं उघडून जिल्ह्याच्या राजकारणात एन्ट्री मिळवली.
राजापूर विधानसभा संघात गत निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या कॉंग्रेसच्या सहदेव ठाकरे यांना मात्र हा मतदार संघ पुन्हा आपल्या ताब्यात मिळवण्यात यश आले. गेल्या निवडणूकीत पीएसपीचे विजयी झालेले लक्ष्मण हातणकर यांचा त्यांनी २ हजार २२५ मतांनी पराभव केला. ठाकरे यांना २२००६ मतं मिळाली तर हातणकर यांना १९७६१ मते मिळाली. लांजा विधानसभा मतदार संघातसुद्धा पीएसपीला पराभवाला सामोरे जावे लागले. तेथे काँग्रेसने प्रथमच यश मिळवले. काँग्रेसचे शिवाजी सावंत हे विजयी झाले. त्यांनी पीएसपीचे जगन्नाथ जाधव यांचा १० हजार ६३१ मतांनी पराभव केला. सावंत यांना २१ हजार ९३९ तर जाधव यांना ११३०८ मतं मिळाली. रत्नागिरी विधानसभा मतदार संघ काँग्रेसने आपल्या ताब्यात मिळवत यश मिळवले. काँग्रेसचे हसनैन एस.ई. हे विजयी झाले. त्यांनी जनसंघाचे कृष्णाजी निवेंडकर ८ हजार ३९० मतांनी पराभव केला. हसनैन यांना २२३२५ तर निवेंडकर यांना १३३९५ मते मिळाली.
चिपळूण विधानसभा मतदार संघातसुद्धा काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसचे उमेदवार पी. के. सावंत यांनी हॅट्रिक साधली, तब्बल २८६१२ मतांनी जनसंघाचे उमेदवार राजाराम भाग यांचा पराभव केला, सावंत यांना ३४३७९ तर घाग यांना ५७६७ मते मिळाली, गुहागर विधानसभा मतदारसंघात मात्र जनसंघाने प्रथमच विजय मिळवत जिल्ह्यातील राजकारणात विजयी एन्ट्री मारली. डॉ. श्री. द. नातू हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रा.स. बैंडल यांचा २२७९ मतांनी पराभव केला. नातू यांना २२१४५ तर बेडल यांना १९८६६ अशी मतं मिळाली.
संगमेश्वर विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या लक्ष्मीबाई भुवड या पुन्हा विजयी झाल्या. त्यांनी जनसंघाच्या उमेदवाराचा दारूण पराभव केला. भुवड यांना २१ हजार ९५२ जनसंघाचे दत्तात्रय भिडे यांना ९ हजार १८६ तर पीएसपीचे मनोहर आणेराव यांना ७ हजार ८०३ मते मिळाली.
खेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार हुसेन दलवाई यांनी हॅट्रिक साधली. त्यांनी जनसंघाचे माधव पालांड यांचा पराभव केला. दलवाई यांना ३००८१ तर पालांडे यांना ५१९६ मते मिळाली, तब्बल २४८८५ मतांनी दलवाई विजयी झाले.
दापोली विधानसभा मतदारसंघातसुद्धा काँग्रेसचे उमेदवार रामचंद्र बेलोसे यांनीसुद्धा सलग तीन वेळा विधानसभेत जाण्याचा मान पटकावला. त्यांनी अपक्ष उमेदवार जे. डी. सकपाळ यांचा ४५८३ मतांनी पराभव केला. बेलोसे यांना २०२२१ तर सकपाळ यांना २५६३७ मते मिळाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:37 PM 05/Nov/2024