‘एनसीसी’च्या कोकणरत्न सागरी मोहिमेला प्रारंभ

रत्नागिरी : दोन महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे कोकणरत्न सागरी नौकाभ्रमण मोहिमेला मंगळवार पासून प्रारंभ झाला.

या मोहिमेची सुरवात भगवती बंदर येथे सकाळी ७ वाजता कोल्हापूरचे एनसीसी ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर अभिजित वाळिंबे यांनी झेंडा दाखवून केली. मिऱ्या ते जयगड, बोऱ्या बंदर व तिथून परत मिऱ्यापर्यंत अशी ही मोहीम आखण्यात आली आहे.

या प्रसंगी २ महाराष्ट्र नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर के. राजेशकुमार, अधिकारी अंकित रवी यांच्यासमवेत आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनचे संस्थापक नंदकुमार पटवर्धन आदींसह एनसीसी छात्र, कर्मचारी उपस्थित होते. भगवती बंदरातून या मोहिमेचा प्रारंभ झाल्यानंतर शिडाच्या दोन बोटी वल्हवत एनसीसी छात्र रवाना झाले. अखिल भारतीय सागरी नौकाभ्रमण मोहीम २०२५ च्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन शिबिरातील ही स्पर्धा आहे. पुणे, मुंबई अ, ब, नागपूर, औरंगाबाद, अमरावती व कोल्हापूर एनसीसी हेडक्वार्टरमधून एनसीसी ६० कॅडेट सहभागी झाले आहेत. रत्नागिरी ते मिऱ्या, ता. ६ मिऱ्या ते साखरतर (काळबादेवी व परत), ता. ७ मिऱ्या ते तिवरी, ता. ८ तिवरी ते वरवडे व परत, ता. ९ तिवरी ते जयगड, ता. १० जयगड ते तवसाळ व परत, ता. ११ जयगड ते बोऱ्या व परत, ता. १२ जयगड ते तिवरी, ता. १३ तिवरी ते मिऱ्या आणि ता. १४ मिऱ्या ते रत्नागिरी असे या मोहिमेचे वेळापत्रक आहे.

जनजागृती करणार
या मोहिमेदरम्यान आमचा समुद्र आमचा अभिमान या अंतर्गत गावागावांत पथनाट्यातून संदेश दिला जाणार आहे. समुद्राबाबत जनजागृती केली जाणार आहे. रत्नदुर्ग किल्ला, भगवती मंदिर, रामेश्वर मंदिर, काळबादेवी, गणपतीपुळे मंदिर, कवी केशवसुत स्मारक, जेएसडब्ल्यू एनर्जी प्रकल्प, रत्नागिरीतील दीपगृह आदी ठिकाणांना भेट दिली जाणार आहे. दररोज पथनाट्याच्या माध्यमातून समुद्राची काळजी कशी घ्यावी या संदर्भाने जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छ भारत अभियान, स्त्री मुक्ती, प्रथमोपचार, पर्यावरणाचा समतोल याबाबत प्रबोधन करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 06-11-2024