रत्नागिरी : वेगवान वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे विजेचे खांब, वीजवाहिन्या पडून गणपतीपुळे, जाकादेवी, मालगुंड, खंडाळा, जयगड व आजुबाजूच्या गावांतील सुमारे १८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या ४० कामगारांना चार दिवस अथक परिश्रम करावे लागले. ऐन पर्यटन हंगामात वीज खंडित राहिल्यामुळे गणपतीपुळे, मालगुंड येथील व्यावसायिकांनाही तोटा सहन करावा लागला.
३१ ऑक्टोबरला २२० केव्ही वाहिनीसह निवळी उपकेंद्र येथून जाणारी ३३/११ केव्ही चाफे व खंडाळा उपकेंद्र यांना जोडणाऱ्या वाहिनीचे दहा खांब पडले होते. त्यामुळे गणपतीपुळे, जाकादेवी, मालगुंड, खंडाळा, जयगड व आजुबाजूच्या गावांतील सुमारे १८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. १ नोव्हेंबरला सायंकाळी वादळ आणि पाऊस थांबल्यानंतर महावितरणकडून दुरुस्तीला सुरवात झाली. सायंकाळपर्यंत दोन खांब उभे करून वाहकताराही जोडण्यात आल्या. सायंकाळी विजांसह झालेल्या जोरदार पावसामुळे आणि अंधारामुळे नाइलाजाने हे काम थांबवावे लागले. उर्वरित आठ खांबांच्या वाहकतारा दरीच्या बाजूला झाडांमध्ये अडकल्या असल्यामुळे महावितरणच्या पथकांकडून काम थांबवण्यात आले. काळोखामुळे कार्यवाही करणे शक्य नव्हते. २ नोव्हेंबरला उर्वरित काम पूर्ण करण्यात आले आणि वाहिनी भारित करण्यात आली; मात्र हे काम करताना कोतवडे शाखा कार्यालय परिसरातही २ उच्चदाब विजेचे खांब आणि ३ लघुदाब विजेचे खांब, मालगुंड शाखा कार्यालय परिसरातील ७ लघुदाबाचे, जाकादेवी शाखा कार्यालय परिसरातील २ लघुदाबाचे खांब पडले होते. हे काम करण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.
दरम्यान, या कामासाठी खंडाळा उपकेंद्रातील ३ सेक्शनचे २० कर्मचारी, रत्नागिरीतील दोन ठेकेदारांची पथकं आणि लांजा येथील एक पथक असे मिळून ४० कामगार चार दिवस अथक परिश्रम करित होते. दिवाळीची सुटी असल्यामुळे कामगारांची कमतरता होती. तरीही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या परिस्थितीवर मात करत वीजपुरवठा सुरळीत केला; मात्र याचा फटका ऐन दिवाळीत फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांसह व्यावसायिकांना बसला. वीजपुरवठ्यासाठी २४ तास जनरेटर चालू ठेवण्याची वेळ आली होती. त्याचा भार व्यावसायिकांवर पडला. पर्यटन हंगामात ही वेळ आल्यामुळे व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. पहिले दोन दिवस वीज नव्हती तर त्यानंतर दोन दिवस कमी दाबाने वीजपुरवठा झाला. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय झाली.
तरवळ, जाकादेवी परिसरात वादळामध्ये विजेचे खांब पडून पुरवठा खंडित झाला होता. त्याचा फटका व्यावसायिकांना बसला. तरीही जनरेटद्वारे वीज सुरळीत ठेवण्याचा खटाटोप काहींनी केला; परंतु वीजपुरवठा कमी दाबाने सुरू राहिल्यामुळे अडचण झाली होती. – कल्पेश सुर्वे, गणपतीपुळे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 06-11-2024














