रत्नागिरी : सण-समारंभात हंगामी व्यवसाय करणाऱ्यांसाठी व्यावसायिक पर्वणीच असते. यामध्ये महिला बचत गट आघाडीवर असून, यंदाही दिवाळीच्या फराळसह आकाशकंदील, डेकोरेटिव्ह पणत्या, दिवाळी किट तयार करून विक्री करण्यात महिला बचत गट अग्रेसर होते. बचत गटांच्या सर्वच उत्पादनांच्या खरेदीला ग्राहकांमधून प्राधान्य मिळत असल्याने बचत गटांमध्ये दिवाळीनिमित्त लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. दिवाळीमुळे बचत गटांच्या अर्थकारणाला खर्चाच्या अर्थाने झळाळी मिळत आहे.
महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी शासन स्तरावर विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्यापैकी एक माध्यम म्हणजे महिला बचत गट होय. या वर्षी दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी होत असल्याने नागरिकांमध्ये सणाचा उत्साह दांडगा राहणार हे लक्षात घेऊन महिला बचत गटांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जोरदार व्यावसायिक तयारी केली होती. हंगामी व्यवसाय करणाऱ्यांसाठी सण-समारंभात व्यावसायिक पर्वणीच उपलध होते. यामध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून घरगुती स्वरूपात छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.
यंदाही दिवाळीच्या फराळासह आकाशकंदील, डेकोरेटिव्ह पणत्या, दिवाळी किट तयार करून विक्री करण्यात महिला आघाडीवर राहिल्या आहेत. ग्राहकांमधून महिला उद्योजिकांच्या या उत्पादनांना पसंती देण्यात आल्याने खरेदीला प्राधान्य मिळत आहे. त्यामुळे बचत गटांमध्ये लाखोंची आर्थिक उलाढाल झाली आहे. उत्पादित मालाला बाजारपेठेत ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बचत गटांच्या अर्थकारणाला दिवाळीची झळाळी मिळाली आहे.
पूजेपासून फराळापर्यंत स्थान
देवघरातील पूजेपासून माहेरच्या फराळाच्या डब्यापर्यंत सर्वत्र बचत गटांच्या उत्पादनांनी आपले स्थान मिळवले आहे. महिलांनी तयार केलेल्या विविध प्रकारचे आकाशकंदील अनेकांच्या घरांमध्ये दिवाळीची शोभा वाढवत आहेत. बाजारपेठेत महिला बचत गटांनी तयार केलेल्या पणत्या, दिवाळी किटची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत आहे. दीपोत्सवाला प्रारंभ झाला असला तरी बाजारपेठेत बचत गटांच्या फराळाची रेलचेल अद्याप सुरूच आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 06/Nov/2024














