रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त भातशेतीचा तातडीने पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सध्या निवडणुकीचा कालावधी असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
परतीचा पाऊस सुरू झाल्यानंतर भातपीक कापणीसाठी तयार झाले होते. मात्र त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे तयार भातशेतीचे नुकसान झाले. जिल्ह्यात हळवे, गरवे, निमगरवे या प्रकारच्या भाताच्या वाणांची लागवड करण्यात येते. हळवे भात दसरा सणावेळीच कापणीस तयार झाले होते. परंतु, तेव्हापासूनच परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असल्याने शेतकरी हैराण झाले. दिवसभर कडकडीत ऊन व सायंकाळी विजांच्या कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पडणारा पाऊस यामुळे दिवसभर कापलेले भात वाळविण्यासाठी शेतावर ठेवावे लागते. परंतु, दुपारनंतर कापलेले भात बांधणीच्यावेळी पाऊस येत होता. यामध्ये भाताच्या उडव्या भिजल्या. त्यानंतर त्यांना अंकुर येण्याची भीती निर्माण झाली.
पाऊस व वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी भात जमिनीवर कोसळले. या कालावधीत हळवे भात, निमगरवे भात तयार झाले असून, गरवे तयार झाले. त्याची कापणी केल्यानंतर घरी नेताना पावसामुळे नुकसान झाले. भात तयार झाले असताना परतीचा पाऊस कापणीसह बांधणीच्या कामाला अडसर निर्माण करणारा ठरला. मात्र या सर्व बाबी सध्या विधानसभेच्या निवडणूक काळात दुर्लक्षित झाल्या आहेत.
पावसामुळे शेतीचे नुकसान होत असतानाच उनाड जनावरे, वन्यप्राणी भातशेतीत घुसून नुकसान करत आहेत. यामुळे शासनाने नुकसानग्रस्त भातशेतीचा तातडीने पंचनामा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 06/Nov/2024














