दापोली : दापोली तालुक्यात ६५ टक्के कुणबी समाज असून आजपर्यंत कोणत्याही पक्षाने या समाजाला कुठल्याही निवडणुकीची उमेदवारी दिलेली नाही. ती उमेदवारी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संतोष सोनू अबगुल यांच्या रूपाने दिली आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर सुद्धा यांनी केले.
दापोली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते ते म्हणाले दापोलीत मनसेने चांगले काम केले आहे. या मतदारसंघाची प्रगती पाहिजे तशी झालेली नाही. गेली २० वर्ष मी आणि तिन्ही तालुक्यांतील माझे सर्व सहकारी पदाधिकारी चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. यापूर्वी दापोली नगरपंचयतीवर मनसेचे चार नगरसेवक निवडून गेले होते. खेड पालिका सातत्याने तीनवेळा मनसेकडे राहिलेली आहे. पंचायत समिती, ग्रामपंचायत किंवा सहकारी संस्था असो प्रत्येक ठिकाणी पक्षाचे प्रतिनिधी आहेत. म्हणूनच दापोली मतदार संघातीलच एक तरुण उमद्या उमेदवाराला याठिकाणी रिंगणात उतरवलेले आहे. मनसेचा मतदार आजही दापोलीत आहे. संतोष सोनू अबगुल एका गरीब आणि शेतकरी कुटुंबातील सदस्य आहेत. एका सामान्य कुटुंबातील सदस्याला पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी उमेदवारी दिली.
कोकणात ६५ टक्के कुणबी समाज आहे. अनेक पक्षांनी कुणबी समाजाला प्रतिनिधित्व देतो अशा प्रतिज्ञा केल्या होत्या. परंतु आजपर्यंत कोणत्याही पक्षाने या समाजाला प्रतिनिधित्व दिलेले नाही. अबगुल यांच्या उमेदवारीने या मतदारसंघातील चुरस वाढलेली आहे. मतदार संघामध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. धनशक्ती नसली तरीही जनशक्ती आमच्याकडे आहे. तसेच आम्ही प्रस्थापित नसून आम्ही विस्थापित आहोत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 06/Nov/2024














