भाजपचे मतदारही मलाच मतदान करतील : आमदार भास्कर जाधव

गुहागर : इथली संस्कृती मी जपलेली आहे. त्यामुळे भविष्यातही जाधव त्रास देणार नाहीत, याची खात्री भाजपला आहे. आज इथे भाजपचा उमेदवार नसल्याने भाजपचे मतदार मला समर्थन देतील, हा मला विश्वास आहे. मनसेने लोकसभेला महायुतीला साथ दिली होती. आता ते वेगळे लढत आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचा फायदा मला होईल, मतदार संघात मोठी सभा होणार नाही, असे आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

आमदार जाधव म्हणाले, हा मतदार संघ २००९ पासून आजपर्यंत शांत ठेवण्यात मी यशस्वी झालो आहे. महेश नाटेकर, विक्रांत जाधव, सचिन बाईत, नेत्रा ठाकूर, पांडुरंग कापले अशा मुख्य कार्यकर्त्यांसोबत युवासेना, अन्य घटक पक्ष प्रचार करतील, शेवटच्या टप्प्यात वेळ मिळाला तर काही सभा मी स्वतः घेणार आहे. या वेळी परगावी असलेले मतदारही गावात येऊन मतदान करतील. ५० हजारांच्या मताधिक्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आले तर मी योग्य जागी तुम्हाला दिसेन, विकासाच्या मुद्दयावर बोलताना ते म्हणाले, पर्यटन विकासावर काम सुरू आहे. रद्द झालेली एमआयडीसी पुन्हा आणायची आहे. गुहागरच्या वेशीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभे करण्याची इच्छा आहे. साखरीआगर जेटीचे काम अधिकाऱ्यांच्या नकारघंटेमुळे रखडले आहे. आता सीआरझेडची सुद्धा यांन परवानगी मिळाल्यामुळे ते काम पुन्हा सुरू होईल. आरजीपीपीएलमधील वीज महाग आहे. देशात गॅस उपलब्ध नाही, अशा कारणांमुळे प्रदूषणविरहित प्रकल्प आज अडचणीत असला तरीही बंद पडणार नाही. निरामय रुग्णालय सुरू होण्यासाठी दोनवेळा प्रयत्न केला; मात्र ऊर्जामंत्री बदलल्याने तो प्रकल्प सुरू होणे राहून गेले आहे. येत्या ५ वर्षांत टोकाचे प्रयत्न करून हे रुग्णालय सुरू करू.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 06/Nov/2024